शिर्डी : साईबाबा संस्थान स्थापनेचा शताब्दी महोत्सवाचा श्रीगणेशा अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला आहे. दुर्दैवाने मात्र साईसंस्थान व शिर्डी नगरपंचायतीच्या पातळीवर याबाबत अक्षरश: सामसुम आहे. याबद्दल भाविकांमध्येही नाराजी आहे.
साईबाबांच्या निर्वाणानंतर बुटींच्या अध्यक्षतेखाली तात्पुरती व्यवस्था म्हणून श्रीसाईनाथ संस्थान समितीची स्थापना करण्यात आली. या समितीला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी काकासाहेब दीक्षितांच्या पुढाकारातून योजना तयार करून नगर डिस्ट्रीक्ट्र कोर्टात दिवाणी दावा दाखल करण्यात आला. या घटनेला न्यायालयाने १३ फेब्रुवारी सोमवार, १९२२ रोजी संमती दिली. दासगणु उर्फ गणेश सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीसाईनाथ ऐवजी श्रीसाईबाबा संस्थान जन्माला आले. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेचे अधिनियम लागू झाले. पुढे संस्थान आपल्या नियंत्रणाखाली घेताना सरकारने त्याचे नामकरण श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यववस्था असे करून घेतले.
१४ फेब्रुवारी २०२१ ते १३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान संस्थान स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करता येणे शक्य आहे. मात्र कोवीड परिस्थीती, व्यवस्थापन-प्रशासन मतभेद, प्रशासन-माध्यमांमधील वाद, ग्रामस्थामधील दर्शनाबाबत संभ्रमाचे वातावरण या सगळ्या गोंधाळात एक ऐतिहासिक क्षण हातातून जावू पहातो आहे. साईबाबांचा समाधी शताब्दी सोहळा शिर्डीकर व भाविकांच्या दृष्टीने अपेक्षाभग करणारा ठरला. राज्य सरकारने बत्तीसशे कोटींची घोषणा करून छदामही न देतात येथूनच पैसे काढले़ हरिनाम सप्ताह व पादुका दौ-यांचे आयोजन वगळता व्हीआयपींच्या दौ-यावरच समाधान मानावे लागले. संस्थान शताब्दीचा सोहळा तरी संस्मरणीय होईल अशी आशा होती. ती तर केव्हाच धुळीला मिळाली.
...
विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार
साईबाबा संस्थानच्या स्थापनेला शंभर वर्षे होत असताना त्याची साधी वाच्यताही न होणे हा संस्थान, कर्मचारी व शिर्डीकरांचा निव्वळ करंटेपणाच ठरेल. या सोहळ्याची शानदार सुरूवात करून वर्षभर पर्यटनाला, विकासाला चालना देतील असे उपक्रम राबवता आले तरी हे वर्ष सार्थकी लागेल. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, तात्या कोतेंचे वंशज निलेश कोते, लक्ष्मीबाईचे वंशज सुधाकर शिंदे, अभय शेळके, ग्रीन क्लीन शिर्डीचे अजित पारख, जितेंद्र शेळके आदींनी सांगितले.