श्रीगोंदा : तहसीलदार प्रदीप पवार व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा शहरातून अवैध वाळू वाहतूक करणारा वाळूने भरलेला एक ट्रक पकडला. मात्र त्यानंतर काही तासातच ट्रकमधील वाळूच गायब झाली. कोणी तरी रात्रीतून वाळू गायब केली. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसात तहसीलदारांनी वाळू चोरांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मागील महिन्यात राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याचा मुरूमचा एक ढंपर पकडून त्याला २ लाख १० हजाराचा दंड ठोठावला.
रविवारी मध्यरात्री तहसीलदारांनी वाळू वाहतूक करणारा एक ट्रक पकडला. तो तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला. मात्र त्यानंतर अवघ्या एक तासातच तहसील कार्यालयाच्या आवारातून हा ट्रक गायब झाला. पुन्हा काही तासाने वाळू कोठेतरी खाली करून रिकामा ट्रक तहसील कार्यालयात आणून लावण्यात आल्याचे समजते. महसूल प्रशासनाकडून मात्र याचा इन्कार केला जात आहे. तहसीलदारांनी रिकाम्या ट्रकवर कशाच्या आधारे कारवाई केली. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
-------
ट्रक सोडला, वाळू गायब झाली. ही केवळ अफवा आहे.
आम्ही रात्रीच्या वेळी ट्रक पकडला. तहसील कार्यालयात आणून लावला. त्यात वाळू होती की नाही ते पाहिले नाही .
यावर नियमानुसार कारवाई करणार आहे. केवळ अफवा आहे.
-प्रदीप पवार,
तहसीलदार, श्रीगोंदा