मुळा नदीच्या पात्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पहानाड गवत आहे. यामुळे पाणी आणि वाळू टिकून राहिली आहे. मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर वाळूची निर्मिती होते. गेल्या तीन वर्षांपासून सलग मुळा नदीला पूर आला आहे. मात्र, मुळा नदीतून गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणामध्ये वाळूचा उपसा झालेला आहे. त्यामुळे नदीपात्र पंचवीस फूट खोल गेले आहे. पहानाडाखाली पाणी आणि वाळू टिकून आहे.
मुळा नदीपात्रात पहानाडमुळे पर्यावरणास हातभार लागला आहे.
पहानाडामुळे पक्षी येथे राहतात. काही प्रमाणात मासे, पक्ष्यांनाही अभय मिळाले आहे. सध्या मुळा नदीपात्रात उन्हाळ्यात वाळूउपसा चालू आहे. दिवसा वाळू उपसून त्याचे ढिग केले जातात. आणि रात्री वाळू वाहतूक केली जाते. मुळा नदीमध्ये खडकही निर्माण झाले आहे. त्यामुळे अजूनही वाळू उपसा चालू आहे.
मुळा नदीकाठी असलेल्या केंदळ, वळण, मांजरी, पानेगाव आदी पूर्व भागात वाळू उचलू दिली जात नाही. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर ती वाळू शिल्लक आहे. मात्र, अन्य ठिकाणी मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा झाला आहे. पूर्व भागात वाळूचा उपसा नियंत्रणात राहिला. मात्र, मुळा नदीच्या पश्चिम भागात राजकीय आश्रयामुळे मोठ्या प्रमाणावर वाळूची वाट लागली. त्यामुळे पर्यावरण असंतुलन निर्माण झाले.
..............
निसर्गाने निर्माण केलेल्या वनस्पतीमुळे पर्यावरणाचा समतोल साधतो. नदीपात्रामध्ये पाणी साठवणे आणि वाळूचे संरक्षण करणे हे काम गवतामुळे शक्य झाले आहे. पहानाड नसते तर पाणी आणि वाळू पहायलाही मिळाले नसते.
- सुभाष जाधव, पर्यावरण तज्ज्ञ
..............