राहुरी: कायदेशीर लिलाव झालेला नसतानाही गेल्या अनेक महिन्यांपासून राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील वाळूच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची राजरोस लयलूट होत आहे. याकडे दुर्लक्ष करणा-या महसूल विभागाची एका नागरिकाने याबाबत थेट राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी भल्या सकाळीच धावपळ उडाली. थेट जिल्हाधिका-यांना यासाठी धावपळ करावी लागली.बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाळू उचलेगिरी करणा-या तस्करांवर कारवाई केली. या कारवाईत संक्रापूर व उक्कलगाव परिसरातील नदी पात्रातून वाळू वाहतूक करणारी १४ वाहने, ३ जेसीबी व २ ट्रॅक्टरसह कोट्यवधी रूपयांचा ऐवज जप्त केला. प्रवरा नदी पात्रात अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे़ ठेकेदाराला नदी काठावरील माती मिश्रीत वाळू उचलण्याचा परवाना ३० मार्चपर्यंत होता़ मात्र नियम धाब्यावर बसवून नदी पात्रातील वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे़ वाळू तस्करांविरूद्ध महसूल विभागाने कारवाई न केल्याने रात्रंदिवस उपसा सुरू होता़ त्यामुळे नदी पात्रात मोठ्या आकाराचे खड्डे पडले होते़ वाळू उपशामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. याशिवाय शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे.एका जागरूक नागरिकाने थेट राज्य सरकारकडे निसर्ग संपत्तीची वाळू तस्करांकडून वाळूचा बेकायदा उपसा करून लयलूट होत असल्याची तक्रार केली होती. तिची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने याबाबत जिल्हा प्रशासनास याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी सकाळीच जिल्हाधिकारी महाजन स्वत: बेकायदा वाळू उपसा सुरू असलेल्या नदी पात्राकडे पोलीस व महसूल खात्याची कुमक घेऊन धावले. श्रीरामपूरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण, राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तलाठी, मंडळ निरीक्षक अशी मोठी कुमक जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वाखालील कारवाईत सहभागी झाली होती. राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर एका नागरिकाने तक्रार केल्यानंतर याबाबत जिल्हाधिका-यांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिका-यांसह ही सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे सांगितले जाते. पण कोणीही अशी तक्रार केली नसल्याचे राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी सांगितले.
लिलाव नसताना संक्रापूरमध्ये वाळूची लूट; १९ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 7:39 PM