श्रीरामपूर : जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी रविवारी रात्री श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तस्करांना दणका दिला. सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत पाच जणांना ताब्यात घेतले. एवढी मोठी कारवाई होऊनही महसूल प्रशासनाने मात्र डोळेझाक केली आहे. महसूल अधिकाऱ्यांना कळवूनही ते कारवाईसाठी पुढे आले नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातच ही कारवाई झाल्याने वाळू तस्कारांचे धाबे दणाणले आहेत.
आरोपींमध्ये सुनीलकुमार चुरामन महतो (बेरमो, जि. बोकारो, झारखंड), मनजीत धुप्पड (आनंदवली, नाशिक), अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा (राजोहा, ता. बहरी, मध्यप्रदेश), युवराजसिंग केशरसिंग भंडारी (बागेसर, डेहराडून) व रवी धुप्पड (श्रीरामपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन पोकलेन, एक बुलडोझर, एक ट्रक, दोन जेसीबी व चार ब्रास वाळू, मोबाईल असा एक कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या आदेशानुसार निरीक्षक मधुकर साळवे यांनी कारवाई केली. पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, हवालदार राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, दादासाहेब लोंढे, आबासाहेब गोरे, काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ, सुनील शिंदे यांचा समावेश होता.
नगर जिल्ह्यात मुळा, गोदावरी, प्रवरा यासह सर्वच नदीपात्रांतून वाळू तस्करी सुरू आहे. लिलावातील अटी, शर्थींचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. रात्रीच्या वेळी जेसीबी व पोकलेनचा वापर करून बेकायदा उपसा होत असल्याचे मातुलठाण (ता. श्रीरामपूर) येथील पोलीस कारवाईतून स्पष्ट झाले आहे. मात्र, एवढे होऊनही महसूल अधिकारी या कारवाईकडे फिरकले नाहीत. तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या म्हणण्यानुसार वारंवार कळवूनही महसूल विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे गौण खनिज उत्खननाची कोणतीही कारवाई होऊ शकली नाही.
दरम्यान, तहसीलदार प्रशांत पाटील यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, पोलीस यंत्रणेने अहवाल दिल्यानंतरच कारवाई केली जाईल. त्यांनी अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. रात्रीच्या वेळी लिलावधारकांकडून वाळू उपसा सुरू होता की, अन्य व्यक्तीकडून? हे समजू शकलेले नाही. नदीपात्रातील अधिकृत लिलावाच्या जागेपासून दोनशे फुटावर हा उपसा सुरू होता, असे समजले, असे मोघम उत्तर दिले.
...
तहसीलदारांचा बचवात्मक पवित्रा
तहसीलदार पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खुलाशावरून महसूल यंत्रणा वाळू विरोधातील कारवाईवर दबावात असल्याचे जाणवते. नाव मिळाले तर कारवाई करू, असा अजब बचाव त्यांनी केला. त्यामुळे महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अधिकारी कारवाईला धजावत नाहीत, असे दिसते.
...