अहमदनगर (प्रतिनिधी)- ढवळपुरी (ता. पारनेर) व नांदगाव (ता. नगर) येथे कापरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत वाळू उपसा चालू असून, त्वरीत वाळूतस्करांवर कारवाई करुन वाळू उपसा थांबविण्याची मागणी आदिवासी भिल्ल युवकांच्या वतीने करण्यात आली आहे. येथे राहणार्या आदिवासी समाजबांधवांना वाळू उपसाचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाळूतस्करांनी या भागात मोठी दहशत निर्माण केली असल्याचे युवकांचे म्हणने आहे. या प्रकरणी लक्ष घालून सदरील अनाधिकृत वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीचे निवेदन आदिवासी भिल्ल समाजातील युवकांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देऊन चर्चा केली. तर चालू असलेल्या वाळू उपसाचे व्हिडिओ चित्रीकरण देखील दाखवले. यावेळी राजू पवार, खेमा घोगरे, रवी बर्डे उपस्थित होते.
के.के. रेंज या लष्करी हद्दीतील कापरी नदी तसेच ढवळपुरी (ता. पारनेर) गावाच्या 1 कि.मी. अंतरावर वन विभागाच्या हद्दीत काही वाळूतस्करांनी 8 ते 10 जेसीबी मशीन लावून वाळू उपसा चालू आहे. तसेच नांदगाव जांबुळबन, लमानतांडा, सुतारवाडी, ढवळपुरी, निमगाव, भाळवणी मार्गे दररोज डंपर वाळू घेऊन जात आहेत. या रस्त्याचा आदिवासी भिल्ल समाजातील लहान मुले व महिला वापर करीत असतात. या गाड्यांचा येथे राहणार्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाळू उपसा करुन सुसाट वेगाने हे गाड्या चालत असतात. येथील नागरिकांना रस्त्यावरुन चालणे देखील धोक्याचे बनले आहे. दीड ते दोन महिन्यापासून वाळूतस्करांनी या भागात हैदोस घातला असून, शेतातून रस्ते पाडून वाळू डंपर धुण्यासाठी विहीराच्या पाण्याच्या देखील ते बळजबरीने वापर करीत आहे. या प्रकरणाकडे महसुल खाते देखील लक्ष देत नसल्याचा युवकांनी आरोप केला आहे.
ढवळपुरी गावाकडे कापरी नदीच्या पात्रात चालू असलेल्या वाळू उपसाच्या ठिकाणी दोन दिवसापुर्वी जाऊन त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला असता. वाळूतस्करांच्या साथीदारांनी दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सदर वाळू उपसा प्रकरणाचे मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले असता तेथील वाळू तस्करांनी जेसीबी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात युवकांनी म्हंटले आहे. या वाळू उपसाचा या भागातील आदिवासी लोकांना खूप त्रास असून, वाळूतस्कर दशहत निर्माण करुन सर्वांना धमकवित आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालून ढवळपुरी (ता. पारनेर) व नांदगाव (ता. नगर) येथे कापरी नदीच्या पात्रात चालू असलेले वाळू उपसा त्वरीत थांबविण्याची मागणी आदिवासी भिल्ल युवकांनी केली असून, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.