जामखेड : तालुक्यातील दिघोळ येथे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जामखेडचे तहसिलदार विजयकुमार भंडारी व त्यांच्या पथकाने वांजरा नदीवर अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत पथकाकडून सहा वाळू ट्रॅक्टर पकडण्यात आले.अचानक पडलेल्या या धाडीमुळे चोरटी वाळू वाहतूक करणारांची कोंडी झाली. यामध्ये गहिणीनाथ एकनाथ गीते (रा. दिघोळ) विना नंबर ट्रॅक्टर, नवनाथ उमराव गीते यांचा स्वराज ९६० विना नंबर ट्रॅक्टर (रा.दिघोळ), अंगद चंदू गीते यांचा एम.एच.१६ ए-१८११५ (रा.दिघोळ), सुशील सखाराम गायकवाड, हनुमंत विलास गायकवाड (रा.जातेगाव), अशोक मनोहर गायकवाड (रा.जातेगाव) असे सहा ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आले. या वाहनांचा पंचनामा करुन सर्व वाहने जामखेड तहसिलमध्ये लावण्यात आली आहे.महसूल नियमानुसार रक्कम रुपये तीस हजार ब्रासप्रमाणे साडे चार ते पाच ब्रास वाळूचे दीड लाख रुपये अंदाजे दंडाची रक्कम आकारण्यात येणार असल्याचे जामखेड तहसिलदार विजयकुमार भंडारी यांनी सांगितले. या पथकात तलाठी विकास मोराळे, एस.एस. कुलकर्णी, एस. एस. हजारे, बी. एम. चौधरी, आय. एन. काळे, प्रफुल्ल साळवे, जे. जे. नागोरे आदींचा समावेश होता.
दिघोळ येथे वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 7:19 PM