राहुरी : राहुरी तालुक्यात वाळूतस्करांचा धुमाकूळ सुरूच आहे. प्रवरा पात्रात अवैध वाळूउपशाला रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्यासह महसूल पथकावर हल्ला केल्याप्रकरणी शुक्रवारी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिंचोली येथील प्रवरा पात्रात तलाठी संजय डोके हे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अवैध वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेले होते. तेव्हा वाळूतस्कर कयूम अब्दुल करीम शेख, सकलेन कयूम शेख, नानासाहेब राऊत व इतर (सर्व रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता) यांनी महसूल पथकावर हल्ला केला. तलाठी डोके यांना मारहाण करण्यात आली. महसूल पथकावर हल्ला करीत वाळूतस्करांनी दोन पिकअप वाहनांमधील वाळू चोरून नेली. पथकाने पकडलेले पिकअप वाहन (क्रमांक एम. एच. १५, डि.के . २६३५) महसूल पथकाच्या ताब्यातून पळवून नेले. याबाबत आरोपींविरोधात वाळूचोरी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड यांनी आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुरी भागात वाळूतस्करांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून, कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडविली जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
राहुरीत तलाठ्यावर वाळू तस्करांचा हल्ला; तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 7:44 PM