अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ हत्येप्रकरणी पोलिसांनी बनावट साक्षीदार दाखविल्याचे सिद्ध झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन तपासी अधिकारी असलेले पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायमूर्ती के. के. सोनावणे व टी.व्ही. नलावडे यांनी सोमवारी (दि.२२) हा निकाल दिला. याप्रकरणी निघोज येथील बबन किसन कवाद व मुक्तार शामीर इनामदार यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.निघोज येथे २१ जानेवारी २०१७ रोजी संदीप वराळ यांची रसाळ टोळीने भरचौकात हत्या केली होती. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एकूण ३३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात बबन कवाद व मुक्तार इनामदार यांचीही नावे होती. या हत्याकांडाचा तत्कालीन उपविभागीयअधिकारी आनंद भोईटे यांनी तपास केला होता.या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, तपासात पोलिसांनी दाखविलेले खोटे साक्षीदार व बनावट कागदपत्रांची तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशा मागणीची याचिका कवाद व इनामदार यांनी अॅड.एन.एस. घाणेकर यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली होती. न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा तपासातील सत्य समोर आले. हत्याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दाखविलेल्या तिघा साक्षीदारांपैकी एक जण हत्याकांडाच्या आधीच मयत झाला होता. दुसरा परदेशात होता. याबाबत न्यायालयाने पोलीस अधीक्षकांकडून चौकशी अहवाल मागितला होता.हा अहवाल न्यायालयासमोर आला. तेव्हा सदरचे जबाब नोंदविताना संगणकावर नजरचुकीने कॉपीपेस्ट झाल्याचा दावा पोलिसांच्यावतीने करण्यात आला. तसेच पोलिसांकडून तपासात चुका झाल्याचेही कबूल केले.याप्रकरणी तपासी अधिकारी आनंद भोईटे यांची या प्रकरणी विभागीय चौकशी आदेशीत केल्याचे तर दुसरे दोषी आढळलेले त्यांचे मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पांडे यांची एक वर्षांकरता पगारवाढ थांबवली असल्याचे म्हणणे न्यायालयात सादर करण्यात आले होते. न्यायालयाने मात्र हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. या तपासात तपासी अधिकारी भोईटे यांनी भादंवि कलम १६७ अन्वये शिक्षेस पात्र गुन्हा केल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने भोईटे यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले आहेत.राज्यभर गाजले होते हत्याकांडनिघोज येथील संदीप वराळ हत्याकांड राज्यभर गाजले होते. या गुन्ह्यातील सराईत आरोपींवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. साक्षीदारासंदर्भातील बनावट कागदपत्र केल्याचे प्रकरण समोर आल्याने हे हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान संदीप वराळ हत्याप्रकरणाचा पोलिसांनी चुकीचा तपास केला असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्ते बबन कवाद यांनी केली आहे.
संदीप वराळ हत्याकांड : तपासी अधिका-यावर गुन्हा दाखल करा - न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:03 AM