केडगाव : दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्युशी झुंज देणाऱ्या संदीप साठे याच्या आई- वडिलांचा हृदयद्रावक संघर्ष ‘लोकमत’ मधून प्रसिद्ध झाला आणि संदीपसाठी अनेकांचे मदतीचे हात सरसावले. जमा झालेली रक्कम त्याच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे.कामरगाव (ता. नगर) येथील संदीप माणिक साठे हा इयत्ता १० वी तील अवघ्या १६ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही किडण्या ऐन १० वी परीक्षेच्या तोंडावर निकामी झाल्याचे निदान नुकतेच झाले. त्याचे आई-वडील लाकूडतोडीचे काम करून घरगाडा चालवतात. त्याचे आई-वडील संदीपला वाचविण्यासाठी आपले मूत्रपिंड देण्यासाठी तयार आहेत. मात्र, त्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २०० ते ३०० रुपये रोजची कमाई करणारे त्याचे आई-वडील इतका खर्च करण्यास असमर्थ असल्याने त्यांनी त्यांचे राहते घरच संदीपच्या उपचारासाठी विक्रीला काढले. ‘लोकमत’ मधून ही व्यथा बुधवारी प्रसिद्ध होताच अनेकांनी आपले मदतीचे हात पुढे केले. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी पुढाकार घेऊन गावातील शेखर सावंत, सागर खोडदे, सुलतान शेख, कैलास आंधळे, तुषार साठे, शाम जाधव, राजेंद्र पोटे, सुदाम ठोकळ, अभय मंडले यांच्यासह मदतनिधीसाठी फेरी काढली, त्यातून ६१ हजार रुपये जमा झाले.कामरगाव येथील इंग्लिश स्कूलमधून २५ हजार रुपये जमा झाले. सोनई (ता. नेवासा) येथील संतोष जनवीर यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. नगरमधील सामाजिक कार्यकर्ते दिनेश बांगरे यांनी १० हजारांची मदत केली तसेच गावातील राजधन ग्रुप, निलक्रांती मंडळ, बजरंग तालीम, चास मंडलचे अनिल तोरडमल, नाभिक संघ, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, उमाजी नाईक प्रतिष्ठान, के.टी.ग्रुप, हरिष देशपांडे, राजू भोर, एडीसीसी बँक कर्मचारी वृंद, कांचन पाटील आदींनी सामाजिक जाणिवेतून मदतनिधीसाठी भरीव मदत केली. राजीव गांधी जीवनदायी योजनेचे जिल्हाप्रमुख डॉ. ज्ञानेश ऐतलवाड यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी शासकीय योजनेतून अडीच लाख रुपये मिळवून देण्याची तयारी दर्शविली. मदतनिधीसाठी संदीपचे बंधू राजेंद्र माणिक साठे यांच्या नावे स्टेट बँक (शाखा, चास, ता. नगर) येथे ३२१९८५७२४९६ या नावे खाते उघडण्यात आले आहे. जिल्हा ब्रोकर संघटनेच्यावतीने संदीपच्या उपचारासाठी भरीव मदत देण्यात येणार असल्याचे संजय छाजेड यांनी सांगितले. (वार्ताहर)
‘संदीप’च्या उपचारासाठी सरसावले हात!
By admin | Published: February 17, 2016 10:32 PM