शेवगाव : शेवगाव तालुक्यात नदीकाठी असलेल्या अनेक गावांमधील नदी पात्रातून विनापरवाना व बेकायदा वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरु आहे. याबाबत कारवाईचे अधिकार असलेल्या महसूल, पोलीस व अन्य यंत्रणा बेफिकीर असल्याने वाळू उपशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून वाळू माफिया विरुध्द कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी पर्यावरण बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने करण्यात आली.शेवगाव तालुक्यातील मुंगीसह वरूर, भगूर, आखेगाव, आपेगाव, मलकापूर, वडुले बुद्रूक, आखतवाडे, सामनगाव, लोळेगाव, ढोरजळगाव, शहरटाकळी, देवटाकळी, खरडगाव,जोहारापूर आदी गावांच्या नदी पात्रातून विना परवाना बेकायदा पद्धतीने होणाºया बेसुमार वाळू उपशामुळे अनेक नद्यांच्या पात्रात बदल होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाळू माफियांनी नदी पात्रात मोठे खड्डे घेतले असून तेथून रात्रंदिवस सुरु असलेल्या वाळू उपशामुळे पर्यावरणालाही धोका संभवतो.शेवगाव तालुक्यात वाळू तस्करीचा धंदा जोरात सुरु आहे. वाळू तस्करी करणाºया वाहनांची माहिती प्रांत कार्यालयाला कळवतो असा संशय घेऊन भगूर येथील तिघांनी ५ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास शिविगाळ करून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार प्रसाद म्हसू (गरुड रा.भगूर) यांनी पोलिसात दिली. याबाबत पोलिसांनी केवळ अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.शेवगाव तालुक्यातील मुंगीसह खरडगाव, आखेगाव, वडुले बुद्रूक, लोळेगाव, आपेगाव, मलकापूर आदी आठ वाळू साठ्यांचा लिलाव अनेक वर्षापासून विविध कारणांमुळे होऊ शकला नाही. मात्र तहसील कार्यालयातील भरारी पथकाकडून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे. अनेकदा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पर्यावरण बचाव समितीच्या वाळू उपसा तक्रारीच्या निवेदनानुसार आपण मंगळवारी मंडलाधिकारी, संबंधित गावच्या तलाठ्यांसह विविध गावांना भेटी देऊन पंचनामे केले आहेत.- दीपक पाटील, तहसीलदार, शेवगाव