संगमनेर : कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेरातील १५ नागरिक आले होते. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (२ एप्रिल) समोर आले. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून संगमनेर शहर व तालुक्यात १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. अहमदनगर शहरातील मुकूंदनगर परिसरात दोन कोरोना रुग्ण सापडले होते. त्यांची चौकशी केली असता ते जामखेड येथे एका कार्यक्रमात गेल्याचे त्यांनी सांगितले. तेथे त्यांच्यासोबत संगमनेरातील १५ नागरिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला समजली होती. हे सर्व जामखेडमध्ये दहा दिवस मुक्कामी होते. ही माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (३१ मार्च) प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया आदींनी तातडीने संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा, रेहमतनगर, बागवानपुरा येथून १३ जणांना तर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथून एक असे चौदा जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी हे सर्व राहत असलेल्या परिसरातील रस्ते बंद केले आहेत. लागण झालेले दोघे आणखी कुणाच्या संपर्कात आले त्याची माहितीही घेण्यात येत आहे.
दोन रुग्ण आढळल्याने संगमनेर १०० टक्के लॉकडाऊन; प्रशासन सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 10:29 AM