संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांसमोरच वाहनचालकांनी आडवी-तिडवी वाहने घालून शहरात वाहतुकीची कोंडी केली.संगमनेर शहरात ठिकठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. पदपथ विके्रत्यांनी व्यापले आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यातच सोमवारी सकाळी अवजड वाहने, बेशिस्त चालक, वाहतूक पोलीसांची उदासीनता यामुळे संगमनेरात मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांसमोरच ही वाहतूक कोंडी होत असताना त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.बसस्थानक, नवीन नगर रस्ता, बाजारपेठ, मेनरोड, दिल्ली नाका, अकोले नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक व शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. हे रस्ते अडथळ्यांची शर्यत बनले आहेत. बसस्थानकात जाण्यासाठी अथवा बाहेर पडण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागत आहे. बेशिस्त वाहनचालक, पदपथावरील विक्रेते, चौकाचौकात वाहन पार्किंग करणारे चालक याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. अतिक्रमणविरोधी पथकाकडूनही कारवाई होत नाही. त्यामुळे संगमनेरातील रस्त्याचा श्वास कोंडत आहे.
संगमनेरात सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:22 PM