संगमनेर (अहमदनगर) : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी पंचायत राज अभियान राबविण्यात येते. त्याअंतर्गत नाशिक विभागात संगमनेर पंचायत समितीला उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२२-२३ चा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी सांगितले.
नाशिक विभागस्तरीय समितीने संगमनेर पंचायत समितीला भेट देऊन सर्व विषयांची पडताळणी केली होती. २०२१-२२ च्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यासाठी एकूण ४०० गुणांची प्रश्नावली निश्चित करण्यात आली. त्यामध्ये पंचायत समितीचा सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग, तसेच शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, विभाग तसेच शाश्वत विकास ध्येय अशा विविध विभागांची पडताळणी करून गुणांकन देण्यात आले.
४०० पैकी ३२८.४२ एवढे गुणांकन प्राप्त होऊन नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्हयातील सर्व तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.