- शेखर पानसरे संगमनेर : शहराच्या जवळून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते संतोषी माता मंदिरापर्यंत असलेला पूल खचून सहा महिने झाले. पूल धोकादायक झाल्याने त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पुलाच्या काम संदर्भात वारंवार मागणी करून कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी ( दि.२३) खचलेल्या पुलाजवळ आंदोलन केले.
शहरातील रंगार गल्लीपासून पुढे गेल्यानंतर म्हाळुंगी नदीचा पूल ओलांडला असता, साईनगर, संतोषी माता मंदिर, पंपिंग स्टेशन, घोडेकर आणि म्हाळस मळा परिसर आहे. तसेच साई मंदिराशेजारी देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्व परिसराला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल खचला होता. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुलाच्या पलीकडे राहणाऱ्या नागरिकांना अकोले नाक्याकडून जावे लागणार असल्याने मोठे अंतर वाढले आहे.
ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात शहर, उपनगरे तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे त्यांनाही महाविद्यालयात जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागतो आहे. म्हाळुंगी नदीवरील खचलेला पूल नवीन बांधा किंवा तातडीने तात्पुरती दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी खुला करावा. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.