Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 03:54 PM2024-11-23T15:54:46+5:302024-11-23T15:56:13+5:30
शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत थोरातांचा पराभव केला आहे.
Sangamner Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा अनेक मतदारसंघांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून यामध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाही समावेश आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी थोरातांचा १० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
संगमनेरची निवडणूक यंदा सुजय विखे पाटील यांच्या एंट्रीने गाजली होती. या मतदारसंघातून लढण्यासाठी सुजय विखे पाटील इच्छुक होते. त्यादृष्टीने विखे यांनी तयारीही केली होती. मात्र एका जाहीर सभेत भाजपच्या एका नेत्याने बाळासाहेब थोरातांच्या कन्येवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानंतर मतदारसंघात जनक्षोभ उसळला. त्यानंतर सुजय विखे यांची उमेदवारी मागे पडली आणि महायुतीच्या जागावाटपात संगमनेरची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली. शिवसेनेनं बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात अमोल खताळ यांना उमेदवारी दिली होती. सुजय विखे यांच्या माघारीनंतर संगमनेरची जागा बाळासाहेब थोरात सहजपणे राखतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अमोल खताळ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत थोरातांचा पराभव केला आहे.
शेवटच्या २१ व्या फेरीअखेर अमोल खताळ यांनी १ लाख १२ हजार ३८६ हजार मते मिळवली, तर बाळासाहेब थोरात यांना १ लाख १ हजार ८२६ मते मिळवता आली. त्यामुळे १० हजार ५६० मतांनी खताळ यांचा विजय झाला आहे.