अहमदनगर : संगमनेरमधून मध्यप्रदेश व बिहारकडे जाणा-या परप्रांतिय कामगारांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार धावून आले. परराज्यात जाणा-या ट्रकला भाडे ठरवून ६०० कामगारांची घरी जाण्याची व्यवस्था तर केली़ बरोबर जेवण आणि पाण्याचे बॉक्स देऊन कामगारांना निरोप देण्यात आला. राष्ट्रवादी युवकचा हा संगमनेरी पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे. इतर तालुक्यांतही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले़. लॉकडाऊन काही अंशी शिथिल करीत राज्य सकरारने कामगारांना घरी जाण्यास मुभा दिली. मात्र प्रशासन आणि कामगार यांच्यात समन्वय होत नसल्याने कामगार पायी चालत घराकडे निघाले आहेत. कामगारांचे लोंढे महामार्गाने चालत आहेत. संगमनेरमधून सुमारे ६०० कामगार मध्यप्रदेश व बिहारकडे पायी निघाले होते. ही बाब राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांच्या निदर्शनास आली. महामार्गावर थांबून कामगारांना एकत्र केले़. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. या मार्गे मोकळ्या जाणा-या ट्रक थांबून त्यांनी कामगार घेऊन जाण्याची विनंती केली. काहींना भाडे ठरवून दिले़ ट्रक चालकही कामगारांना घेऊन जाण्यास तयार झाले. संगमनेरचे तहसीलदारांनीही पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत कामगारांना एकत्र करण्याचे आवाहन केले़. आता इतर तालुक्यांतील तालुकाध्यक्षांनाही कामगारांना घरी जाण्यासाठी मदत करण्याचे आवाहन पवार यांनी केले असून, प्रशासन आणि कामगारांमध्ये समन्वय साधून त्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे पवार म्हणाले़.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संगमनेरी पॅटर्न फेमस; ६०० कामगारांना केली घरी जाण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:20 PM