संगमनेर : शहरातील जमजम कॉलनी, जोर्वे रस्ता, भारतनगर, कोल्हेवाडी रस्ता या परिसरात दररोज गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येते. संगमनेरातील गोमांस मुंबई, ठाणे तसेच परराज्यातसुद्धा पाठविण्यात येते. परंतू याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करत सोमवारी (दि.०४) येथील प्रांत कचेरीसमोर आंदोलन सुरू केले आहे.
गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेले कत्तलखाने कायम स्वरूपी बंद करावेत. अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथील वाड्यांमध्ये शनिवारी (दि. ०२) पाेलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल १ कोटी ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला होता. यात ३१ हजार किलो गोमांस जप्त करत ७१ गोवंश जनावरांना जीवदान मिळाले होते.