शिर्डी : लग्नाचे आमिष दाखवून संगमनेरच्या एका महिला डॉक्टरवर शिर्डीतील हॉटेल व सरकारी विश्रामगृहात वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विजय मकासरे (मूळ रा. राहुरी, हल्ली रा. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मकासरे फरार आहे.शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे, की विजय मकासरे याची व माझी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्याने मला लग्नाचे व रुग्णालय बांधून देतो, असे आमिष दाखविले होते. त्यानुसार त्याने मला आळंदी येथे नेऊन खोटे कागदपत्र तयार करून लग्न केल्याचा बनाव केला. एक वर्षाच्या दरम्यान शिर्डीतील सरकारी विश्रामगृह व खासगी दोन हॉटेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याने वेळोवेळी अत्याचार केला. तसेच मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी शिर्डी पोलिसात बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार संदीप दहिफळे तपास करीत आहेत.
तृप्ती देसाई यांचे आवाहन
या प्रकरणातील पीडित महिलेस न्याय देण्यासाठी नगर जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठवावा. संबंधित आरोपीस त्वरित अटक करावी, या आरोपीस सरकारी विश्रामगृह कसे दिले? कोणत्या कारणास्तव दिले गेले? याची चौकशी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.