मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांच्याविरोधात आमदार संग्राम जगताप आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विशेष म्हणजे, संग्राम जगताप हे भाजपाचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत.
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने नगरची जागा सोडावी, अशी मागणी होत होती. मात्र, राष्ट्रवादीने जागा न सोडल्यामुळे थेट भाजपामध्ये दाखल होत सुजय विखे-पाटील यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. भाजपाकडून सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता सुजय विखे पाटील यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगरच्या जागेसाठी अरुणकाका जगताप आणि प्रशांत गडाख यांची नावे चर्चेत होती. मात्र, संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यात चुरस असणार आहे.
(कोण आहेत सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरलेले संग्राम जगताप?)
आमदार संग्राम जगताप पहिल्यांदा 2009 मध्ये अहमदनगर महापालिकेच्या नगरसेवक पदी निवडून आले. याचवेळी पहिल्यांदा ते महापौर झाले. 2014 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा ते निवडून आले. त्यावेळी दुस-यांदा ते महापौर झाले. महापौर पदावर असतानाच त्यांनी 2014 मध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला. त्यांनी सेनेचे उपनेते अनिल राठोड आणि भाजपाचे उमेदवार अभय आगरकर यांचा पराभव केला होता.