श्रीगोंदा : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात श्रीगोंदा शहर चकाचक करण्यासाठी स्वच्छतादूतांची टीम मैदानात उतरली आहे. त्यांनी शहर दहा दिवसांत चकाचक करण्याचा संकल्प केला आहे.
अभियानाची सुरुवात सोमवारी संत शेख महंमद महाराज मंदिर परिसर स्वच्छ करून वृक्षारोपणाने करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, मुख्याधिकारी मंगेश देवर, शहाजी खेतमाळीस, संग्राम घोडके, सीमा गोरे, मनीषा वाळके, संतोष खेतमाळीस, सतीश मखरे, महावीर पटवा, समीर बोरा, प्रशांत गोरे, दत्ताजी जगताप आदी सहभागी झाले होते. काही नगरसेवकांनी पहिल्याच दिवशी या अभियानाकडे पाठ फिरविली.
एक दिवसाआड होणाऱ्या या अभियानात तहसील कार्यालय, बाजारतळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, सिद्धेश्वर घाट, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, जोधपूर मारुती चौक, नगरपालिका परिसर, बसस्थानक, इदगाह मैदानाची साफसफाई करण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यापारी सहभागी होणार आहेत .
----
नागरिकांनी शहराची स्वच्छता व स्वत:च्या आरोग्याचा विचार करून प्लास्टिकचा वापर करू नये. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. ओला आणि सुका कचरा वेगळा करावा व स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे.
- शुभांगी पोटे,
नगराध्यक्षा, श्रीगोंदा
फोटो : ०७ श्रीगोंदा पालिका
श्रीगोंदा शहरातील स्वच्छता अभियानात सहभागी झालेले स्वच्छता दूत.