केडगाव : सारोळा कासार सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय रावसाहेब काळे तर उपाध्यक्षपदी मनीषा शिवाजी कडूस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सारोळा कासारऐवजी नगरमधील जिल्हा बँकेच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
सारोळा कासार सोसायटीच्या ३ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत शिक्षकनेते संजय धामणे यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही विकास आघाडीने १३ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या. पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांच्या गटाचा पराभव केला होता. त्यानंतर रविवारी पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.
अध्यक्षपदासाठी संजय काळे यांच्या नावाची सूचना गोरक्षनाथ काळे यांनी मांडली. त्यास बाळासाहेब धामणे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी मनीषा कडूस यांच्या नावाची सूचना जयप्रकाश पाटील यांनी मांडली. त्यास शिवाजी वाव्हळ यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित संचालक संजय धामणे, बापूराव धामणे, महेश धामणे, चंद्रभान जाधव, बाळासाहेब धामणे, नामदेव पाटील, सुभाष धामणे, विठ्ठल कडूस आदी उपस्थित होते.