तीसगाव : श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत कानिफनाथ देवस्थानचे तीन कार्यरत विश्वस्थ निवडून आले. त्यापैकी देवस्थानचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड यांची सरपंचपदी, तर विश्वस्त रवींद्र आरोळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. गावाच्या इतिहासात प्रथमच असा दुहेरी योग जुळून आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी संतोष उगार यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात झाली. पोपटराव घोरपडे यांनी सरपंचपदासाठी, तर विमल मरकड यांनी उपसरपंचपदासाठीची सूचना मांडली. त्या सूचनेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोधची घोषणा करताच गावच्या वेशीत फटाक्यांची आतषबाजी झाली.
माजी सरपंच भगवानराव मरकड, शिवतेज विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. देवस्थान व ग्रामपंचायत, अशा स्थानिक महत्त्वाच्या संस्थांत एकविचार व विकासाच्या ध्येयाने प्रेरित असणारे सदस्य आले आहेत. त्यामुळे गावच्या सार्वत्रिक हिताची जपवणूक केली. विविध राज्यांत लौकिक असलेल्या चैतन्य कानिफनाथांच्या नगरीचा चौफेर विकासासाठी मेहनत करू, अशी ग्वाही सरपंच संजय मरकड यांनी दिली. कांता मरकड, गणेश मरकड, विधिज्ञ मोनिका पोळ, चंद्रभान पाखरे, वैशाली मरकड उपस्थित होते. ग्रामसेवक श्याम साळवे यांनी आभार मानले.
फोटो : ११ मढी
मढी येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला.