अहमदनगर : मागेल त्याला शेततळे, या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित एक हजार शेततळे येत्या मे अखेरीस पूर्ण केले जाणार आहेत. सात हजार शेततळ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे अनुदान कृषी विभागाकडून वितरीत करण्यात आले आहे.
शासनाने मागेल त्याला शेततळे, महत्वाकांक्षी योजना हाती घेतला आहे. २०१६ मध्ये सुरू करण्यात या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. मात्र शासनाकडून जिल्ह्याला ९ हजार २०० एवढे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयामार्फत शेततळ्यांची योजना राबविण्यात येते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात ८ हजार २३० शेततळे खोदण्यात आले आहे. त्यापैकी सन २०१६ मध्ये खोदलेल्या २ हजार ६९८ शेततळ्यांत पाणी साचले होते. तळे खोदण्यासाठी शेतक-यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले असून, शेततळ्याचे छायाचित्र कृषी विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सरकारने वैयक्तिक लाभाच्याही योजना सुरू केल्या. मागेल त्याला शेततळे, ही योजना त्याचाच एक भाग आहे. ज्या शेतक-यांनी अर्ज दाखल केले, त्यांना प्रत्येकाला शेततळे मिळालेले नाही. शेततळ्यांमध्ये पाणी साचविण्यासाठी कागद टाकणे गरजेचे असते. परंतु, त्याची खरेदी करणे शेतक-यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शेततळे होऊन कागदाअभावी जैसे थे आहेत. शासनाने कागदासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली,परंतु, या योजनेंतर्गत कागद मिळत नसल्याने शेततळे शेतक-यांसाठी पांढरा हत्ती ठरणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.शेततळ्यात कर्जत तालुका टॉपवरजिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत तालुक्याला १ हजार ७०० शेततळे मंजूर आहेत. त्यापैकी १ हजार ५४८ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले. जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांची कर्जत तालुक्यात झाली आहेत. उर्वरित तालुक्यांत शेततळ्यांची संख्या कमी आहे.कुठे किती शेततळेअकोले-८४६, जामखेड-२४१, कोपरगाव-६५०, नगर-६२०, नेवासा-३२६, पारनेर-५२९, पाथर्डी-३८०, राहाता-४७१, राहुरी-२४०, संगमनेर-९२३, शेवगाव-१८०, श्रीगोंदा-९७४, श्रीरामपूर-३१२