कोपरगाव : कॅनडा सरकारच्या मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप्स या संस्थेमार्फत कॅनडामधील ओंटॅरिओ प्रांतातील युनिव्हर्सिटी ऑफ विंडसोरमध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील संकेत सुरेश इंगळे याची ३ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.
कोल्हे म्हणाले, या कालावधीमध्ये संकेतला ५ लाखांचे स्टायपेंडही मिळणार आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या ४ विद्यार्थ्यांपैकी संकेत हा एकमेव ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या व संशोधनात्मक प्रतिभा संपन्नता असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधनकामी इंटर्नशिप करता यावी, यासाठी भारत सरकारच्या अखत्यारीतील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली या संस्थेने कॅनडा सरकारच्या मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप्स या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे.
यंदा महाराष्ट्रातील फक्त ४ विद्यार्थ्यांचा या निवडीमध्ये समावेश आहे. यात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय जरी कोपरगावसारख्या ग्रामीण भागात असले, तरी संजीवनीच्या संकेतने संस्थेत असलेल्या संजीवनी इंटरनॅशनल डीपार्टमेंटच्या मार्गदर्शनाखाली या निवडीमध्ये बाजी मारून संजीवनीच्या वैभवात भर घातली असल्याचेही कोल्हे यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमित कोल्हे यांनी संकेतचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
.................
कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन पद्धतीने अनेक वेबिनार, कार्यशाळा आयोजीत करण्यात आल्या होत्या. या उपक्रमांमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध देशात काय सुविधा आहेत. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातूनही कसे अर्थसहाय्य पुरविल्या जाते, याची जाणीव झाली. त्यातूनच कॅनडा सरकारच्या मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप्स यासंस्थेमार्फत इंटर्नशिप उपक्रमात निवड होण्याची जिद्ध ठेवत यश मिळविले.
- संकेत इंगळे,
विद्यार्थी