अहमदनगर : प्रती पंढरपुर म्हणून ख्यात असलेले संत कवि श्री. माहिपती महाराज संस्थान श्री. क्षेत्र ताहाराबाद येथून आषाढी वारीला जाणारा पायी दिंडी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्या ३०० वर्षांपासूनची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे. कोरोना महामारीमुळे देशावर ‘न भूतो न भविष्यती’ असे संकट आले आहे. वारकºयांची सुरक्षितता व कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून केंद्र व राज्य सरकार तसेच वारकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील हजारो पालखी सोहळे स्थगित झालेले आहेत. त्याच नियमानुसार संत कवि माहिपती महाराजांचा पालखी सोहळा या वर्षी स्थगित करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळ व वारकरी मंडळाने घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी दिली. संत कवि माहिपती महाराजांचे वडील दादोपंत कांबळे नित्य नियमाने पंढरीची वारी करत होते. त्या मुळे तीनशेपेक्षा अधिक वर्षांची परंपरा या वर्षी खंडीत होत असल्याने असंख्य भाविकांची निराशा झाली आहे. संत कवि माहिपती महाराजांचा पालखी सोहळा शासनाचे नोंदणी कृत सोहळ्यात ३५ वा नंबरने समाविष्ट केलेला आहे. या पायी दिंडीत सहभागी होणारे वारकºयांना अन्न दान, आर्थिक मदत आदी सोयी-सुविधा पुरविणारे दानशूर मोठ्या प्रमाणात दरवर्षी सेवा पुरवितात. त्यांचीही आरोग्याची काळजी घेणे गरेजेचे असल्याचे वारकरी मंडळावे सांगितले. केंद्र सरकार व राज्य सरकार या महामारीचा एकत्रितपणे सामना करीत आहे. डॉक्टर, नर्सेस,पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस अधिकारी व स्टाफ, सफाई कर्मचारी, अन्न पुरवठा खात्याचा स्टाफ, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, होमगार्ड, केंद्राचे व राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक या कठीण प्रसंगी गोरगरिबांना आर्थिक व अन्नदानाची मदत करीत आहे. अशा सर्व कोरोना वॅरियर्सचे संस्थान व वारकरी मंडळाच्यावतीने जाहिर आभार केले. --
संत महिपती महाराज पालखी सोहळा रद्द, तीनशे वर्षांची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 2:43 PM