राहाता : अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार दीपक पोकळे याला जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले. गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस व चॉपरसह रविवारी सकाळी लोहारे शिवारात पोलिसांनी त्याला जेरबंद केले.राहाता परिसरात खून, जबरी चोरी, दरोडा, मोटारसायकल चोरी अशा अनेक गुन्ह्यांत राहाता पोलिसांना दीपक पोकळे हवा होता. रविवारी तो लोहारे शिवारात असल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस निरीक्षक देविदास पवार, सहायक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे आदींच्या पथकाने लोहारे शिवारात सापळा रचून पोकळे (वय २३) याला त्याच्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावरील एका वस्तीवर गोठ्यात झोपलेला असताना ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी कट्टा ,दोन जीवंत काडतुसे व चॉपर आढळून आले. १२ जून रोजी सकाळी दहेगाव शिवारात कट मारल्याच्या कारणावरुन दीपक पोकळे याने दहेगाव येथील विवेक प्रेमसुख डांगे याच्यावर चॉपरने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून पोलीस पोकळेच्या मागावर होते. (वार्ताहर)
सराईत गुन्हेगार दीपक पोकळे जेरबंद
By admin | Published: July 11, 2016 12:33 AM