हिवरेबाजार : कमी वेळेत भरपूर पैसा कमविण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता ‘सैराट’ सारखे चित्रपट काढतात. त्यामुळे तरूण पिढी बरबाद होते. ‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले. स्वत:च्या पायावर उभे राहा, शिक्षण पूर्ण करा, मग सैराट व्हा, असा सल्ला जलसंधारण तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे तरुणांना दिला.नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडले आहेत. मराठी रसिकांना या चित्रपटाने वेड लावले आहे. एवढेच नव्हे तर मराठीतील या लोकप्रिय चित्रपटाचा आता तेलगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिमेक होणार आहे. तेलगु चित्रपट स्वत: नागराज दिग्दर्शित करणार असल्याचे समजते. शिवतारे यांनी मात्र अशा चित्रपटांमुळे तरुण पिढी बरबाद होते, अशी भीती व्यक्त केली आहे. तरुणांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे त्यांनी हिवरेबाजार (ता. नगर) येथील जलसंधारण व विकास कामांची पाहणी केल्यानंतर सांगितले. देशाचा विकास करायचा असेल तर अगोदर गावे सुधारली पाहिजे. ग्रामीण भागासाठी सरकारी योजना भरपूर आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावकऱ्यांचे संघटन व एकोपा महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. पोपटराव पवार यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व गावाला लाभले. निवडणूक बिनविरोध झाली तर गावाचा आपोआप विकास होईल. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची पातळी वाढणार आहे. शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवतारे यांच्या हस्ते गावात वृक्षारोपणही करण्यात आले. रविवारची सुट्टी असूनही येथील आरोग्य उपकेंद्र चालू असल्याचे पाहून त्यांनी येथील कर्मचारी ज्योती तोडमल यांचे कौतुक केले. सुट्टीच्या दिवशी उपकेंद्र चालू ठेवणारे हे राज्यात एकमेव गाव आहे.(वार्ताहर)कर्जत : मी नियोजनबद्ध विकास कामे हाती घेतली आहेत. मला विकास कामांचं याड लागलंय, त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले.कर्जत येथे रोटरी क्लबच्या सहकार्यातून उभारलेल्या समर्थसागर तलावातील पाण्याचे पूजन रविवारी शिंदे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून कर्जतच्या दोन्ही बाजूस भरीव काम झाले. यामध्ये पावसाचे पाणी साठले. याबद्दल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील २१ गावे या योजनेत आहेत. त्यांचा नऊ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार झाला आहे. कर्जतसाठी निधीची भरीव तरतूद करण्याची ग्वाही त्यांनी दिली. समर्थसागरचे दिशादर्शक काम झाले आहे. या कामासाठी सामाजिक संस्थांप्रमाणेच इतरांनीही पुढे येऊन लोकचळवळ निर्माण व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत, रोटरीचे अध्यक्ष संदीप काळदाते, प्रांत अधिकारी रवींद्र ठाकरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची भाषणे झाली. उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे, सभापती श्रीधर पवार, पणनचे संचालक प्रसाद ढोकरीकर, भाजपाचे शहराध्यक्ष रामदास हजारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले!
By admin | Published: June 27, 2016 12:53 AM