संगमनेर : अध्यात्मामुळे भारत हा संस्कृतीप्रधान देश म्हणून जगात अव्वल क्रमांकावर आहे. मनुष्याच्या जीवनाचा अर्थ अध्यात्मात आहे. समाज सुस्थितीत ठेवण्याकरिता भक्तीशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. शुक्रवारी नाईक यांनी तळेगाव दिघे येथे सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सांगता समारंभप्रसंगी सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनास हजेरी लावली. व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार आर. एम. वाणी,आमदार अशोक काळे आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, मनुष्य जीवनातील चिंता व नैराश्य अध्यात्माच्या माध्यमातून दूर होतात. बाह्यविकासासाठी आंतरीक विकास होणे गरजेचे आहे. या सप्ताहाला थोर परंपरा आहे. प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याची शक्ती वारकरी संप्रदाय देतो. आपण त्याचे पाईक असून हा वारसा पुढे न्यायचा आहे. म्हणून अध्यात्माचा भक्त या नात्याने सप्ताहास उपस्थित राहिल्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले. भुजबळ यांनी राज्यात पर्यटन विकासावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केल्याचे सांगून केवळ दु:खातच देवाचा धावा न करता सुखातही देव, साधू-संतांचे नामस्मरण करायला हवे, असे सांगितले. थोरात यांनी सप्ताह हा मानव धर्माचे व्यासपीठ आहे. रामगिरी महाराजांच्या निमित्ताने मठाला आदर्श वारसा मिळाला असून तो महाराजांनी देशभर घेवून जाण्याची सूचना केली. लोखंडे, सुरेश चव्हाणके व तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरीनामाच्या जयघोषात सप्ताहाची सांगता झाली. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, जिल्हा बँक अध्यक्ष बाजीराव खेमनर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सराला बेटला ‘हेरिटेज’चा दर्जा
By admin | Published: August 08, 2014 11:36 PM