लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : बघतो, करतो, वर बोलावं लागेल. भेटावं लागेल. मी पाहतो, असे शब्द कोणतेही काम घेऊन गेलेल्या लोकांना लोकप्रतिनिधींकडून ऐकण्याची जणू सवयच झालेली. मात्र, पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचा सरपंच परिषदेला आलेला अनुभव अचंबित करणाराच ठरला. लंके यांनी सरपंच परिषदेचे निवेदन स्वीकारले. चर्चा केली अन् लगेच तेथेच बसून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना पत्र लिहिले. सरपंच परिषदेच्या मागण्या तत्काळ मार्गी लावण्याचे साकडे घातले. तसेच आता तुमचे प्रश्न माझे झालेत. हे प्रश्न सुटेपर्यंत मी पाठपुरावा करणार, अशी ग्वाही लंके यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते, प्रदेश महासचिव विकास जाधव, नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी नुकतीच पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या भाळवणी येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष काकडे यांनी राज्यातील कोरोनाने मृत झालेल्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून १० लाखांची मदत मिळावी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा २५ लाखांचा विमा व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे प्रथम लसीकरण होण्याबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी असे सुचवले. आमदार लंके यांनी तत्काळ मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना पत्र लिहिले. सरपंचांच्या या मागण्यांबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी विनंतीही मंत्र्यांना केली. आमदार लंके यांच्या कामाची पद्धत पाहून सरपंच परिषदेचे पदाधिकारीही भारावून गेले.
ग्रामपंचायतींना कोविड सेंटर उभारण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेला आहेत, त्या संदर्भात ग्रामपंचायतींना मार्गदर्शन व्हावे, ग्रामपंचायतींच्या सेंटरमधील सोयीसुविधा कशा असाव्यात, याबाबतही सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार लंके यांच्याशी चर्चा केली. तसेच सरपंच परिषदेच्या विविध प्रश्नांबाबत आमदार लंके यांनी सरकारकडे पाठपुरावा करून सरपंचांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. त्यावर लंके म्हणाले, मी सरपंच म्हणून माझ्या गावात काम केलेले आहे. ग्रामपंचायतींना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. सरपंच पदावर काम करताना खूप मोठी कसरत करावी लागते. सरपंच जे काम करू शकतो, ते काम इतर लोकप्रतिनिधी करू शकत नाही. त्यामुळे सरपंच परिषदेने दिलेल्या महत्त्वाच्या मागण्या नक्कीच शासनाकडून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही आमदार लंके यांनी दिली.