राळेगण : गावचा सरपंच नव्हे तर राज्याचा मुखमंत्री सुद्धा जनतेने निवडून दिला पाहिजे, तीच खरी लोकशाही म्हणता येईल. खेड्यांचा विकास पक्ष आणि गटामुळेच खुंटला आहे. घटनेप्रमाणे समुदायाला निवडणूक लढवता येत नाही. ती व्यक्तीनेच लढवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
थेट जनतेतून सरपंच निवडला जावा हेच महत्त्वाचे आहे. जर तो निवडला जात नसेल तर यासंबंधाने राज्यभर आंदोलन उभे होणे गरजेचे आहे. लोकशाही लोकांची आहे. लोकांच्या लोकसहभागातूनच ती चालली पाहिजे, असेही ही अण्णा हजारे म्हणाले. राज्य शासनाने लोकनियुक्त सरपंच पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गीते पाटील आणि सरपंच पदाधिकाऱ्यांनी आज आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. त्याप्रसंगी आण्णा यांनी वरील संदेश दिला आण्णा हजारे यांनी सध्या मौनव्रत धारण केले आहे. त्यामुळे कागदावर लिहून त्यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी अण्णांच्या चालू असलेले मौनास सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच राज्य शासनाने जनतेतून लोकनियुक्त सरपंच रद्द बाबत घेतलेला निर्णय राज्यातील सरपंचांना मान्य नसून याबाबत अण्णांचे लक्ष वेधले. राज्य शासनाच्या निर्णयाबाबत अण्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच पदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदाची निवड जनतेतून निवड व्हावी, राज्य शासनाने जनतेचा हा अधिकार हिसकावू घेऊ नये. खेड्यांचा विकास गटतट आणि पक्षीय राजकारणामुळे थांबलेला आहे. राज्यातील सरपंच व जनतेने याबाबत तीव्र स्वरूपाचा विरोध करावा. राज्यातील सरपंचांनी तसे ठराव करावेत व राज्य शासनाला पाठवावेत, असे सांगितले.
याचबरोबर, प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सरपंच परिषदेच्या माध्यमातून या असणाऱ्या शासनाच्या निर्णयाला प्रचंड विरोध करणार असल्याचे सांगितले. राज्यातील जनतेने याबाबत सरपंच परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी थोरात, प्रदेश सदस्य नारायण वनवे, आबासाहेब सोनवणे ,अरुण ठाणगे, स्वाती नऱ्हे व सरपंच उपस्थित होते.