पारनेर : राळेगणसिध्दी येथे शनिवारी आयोजित जलयुक्त शिवार योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेकडे अनेक सरपंचांनी पाठ फिरविली. २७९ गावांपैकी केवळ नव्वद ते शंभर सरपंचांनीच हजेरी लावली. महिला सरपंचांची उपस्थिती बोटावर मोजण्याइतकी होती. जिल्ह्यात मागील वर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुमारे २७९ गावांची निवड करण्यात आली होती. या गावातील कामासंदर्भात सरपंचांना मार्गदर्शन व्हावे म्हणून जिल्हा कृषी विभागातर्फे कार्यशाळा आयोजित केली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, कृषी सहसंचालक विजय इंगळे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे आदींनी वेळेत हजेरी लावली. परंतु पहिल्या टप्प्यात सरपंचांची उपस्थिती कमी होती. त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते, पारनेरमधील कृषी कर्मचारी यांना सभागृहात बसविण्यात आले. जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवारमधील २७९ सरपंच असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. परंतु ‘लोकमत’ने माहिती घेतल्यावर मोजून नव्वद ते शंभर सरपंचांचीच उपस्थिती असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणच्या महिला सरपंचांच्या पतींनीच हजेरी लावल्याचे दिसून आले. अण्णा हजारे, कृषी राज्यमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. सदस्य विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार भारती सागरे, लोणी हवेलीचे सरपंच सुभाष दुधाडे, राळेगणसिध्दीच्या सरपंच मंगल पठारे, उपसरपंच लाभेष औटी, अनिल पावडे, बाबासाहेब सासवडे, भाऊसाहेब भोगाडे आदींसह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
‘जलयुक्त’च्या कार्यशाळेत सरपंचांची दांडी
By admin | Published: March 13, 2016 2:11 PM