लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात ९ व १० फेब्रुवारीला पार पडला. या निवडीत माजी मंत्री शंकरराव कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या येसगाव ग्रामपंचायातीचे सरपंचपद हे अनुसूचित जमातीच्या स्त्रीकरिता राखीव होते, तर तिळवणी व मढी खुर्द या दोनही ग्रामपंचायतींत सरपंचपदाचे आरक्षण हे अनुसूचित जातीच्या स्त्रीकरिता राखीव होते.
मात्र, या तीनही ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांपैकी सरपंचपदाच्या आरक्षणाची एकही महिला सदस्य नसल्याने या गावात सरपंचपदाची निवडच झाली नसल्याने येथील पद रिक्त असून फक्त उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या. उर्वरित २६ गावच्या सरपंच, उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या आहे.
दोन दिवस चाललेल्या निवडणूक प्रक्रियेत सकाळी १० ते ११ सरपंच, उपसरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ११ ते १२ दाखल अर्जाची छाननी करण्यात आली, १२ ते १ अर्ज माघारी, त्यानंतर २ वाजता सभा घेऊन सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला शासकीय सेवेतील एक निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामसेवक यांनी काम पाहिले.
गुरुवारी २६ ग्रामपंचायातींच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या, तर बुधवारी येसगाव येथे सरपंचपद रिक्त राहिले. तर उपसरपंचपदी सचिन कोल्हे यांची निवड झाली. मायगाव देवी येथे सरपंचपदी दिलीप शेलार तर उपसरपंच मुकुंद गाडे यांची निवड झाली. काकडी येथे सरपंचपदी पूर्वा गुंजाळ तर उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे यांची निवड झाली आहे. या सर्व गावांत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी महसूल विभाग, निवडणूक शाखा, सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाने परिश्रम घेतले.
............
येसगाव, तिळवणी व मढी खुर्द या तीन ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे येथील सरपंचपदाची निवडणूक घेता आली नाही. फक्त उसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या. त्यामुळे या निवडीसंदर्भात पुढील आदेश व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
-योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव.
.....................
फोटो१० – संवत्सर-सरपंच, उपसरपंच निवड फोटो