अहमदनगर : नगर शहरासह सावेडी, केडगाव, आगरकरमळा, भिंगार आदी भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी असून, ज्येष्ठ नागरिकांना कोरोनावरील लस घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तासन्तास रांगेत उभे राहून त्यांना लस मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिकेने शहरात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. १८ ते ४४ वयोगटातील आणि ४६ वर्षांपुढील, असे लसीकरणाचे टप्पे आहेत. लस घेण्यासाठी शहरातील सर्वच केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही लस घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. ज्येष्ठांना तासन्तास रांगेत उभे राहणे शक्य होत नाही. शरीर साथ देत नाही. त्यात अशा ठिकाणी त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. घरातील ज्येष्ठ नागिरकांना आपण बाहेर पडू देत नाही. प्रत्येक जण घरातील आई- वडील, ज्येष्ठांची काळजी घेताना दिसतो आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना आहे असे सांगितले जाते; परंतु कोरोनावरील लस घेण्यासाठी मात्र त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले जाते. त्यात नंबर जवळ आल्यानंतर लस संपली उद्या या, असे उत्तर मिळते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
.....
ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केंद्रांवर नागिरकांच्या रांगा लागेल्या असतात. ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस दिली जात नाही. त्यामुळे ६० वर्षांवरील नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून लसीकरणाबरोबरच त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील.
-सर्वोत्त क्षीरसागर, अध्यक्ष, सावेडी ज्येष्ठ नागरिक मंच
....
लसीकरण केंद्रातून संसर्गाचा धोका
कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना आहे. असे असताना ज्येष्ठ नागरिकांना इतरांच्या रांगेत उभे राहून लस घ्यावी लागत आहे. तासन्तास त्यांना रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. ६० वर्षांपुढील नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष किंवा केंद्र सुरू केल्यास त्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
....
ज्येष्ठांना कोव्हॅक्सिन उपलब्ध करून द्या
शहरातील ज्येष्ठ नागिरिकांनी पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतला आहे. दुसरा डोस त्यांना देणे गरजेचे आहे; परंतु, सध्या कोव्हॅक्सिन उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. कोव्हॅक्सिन ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु, शहरात ही लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित राहण्याची भीती आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध करून द्यावा
- रवींद्र बारस्कर, सभागृह नेते, महापालिका