श्रीरामपूर : तालुका व शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचे योग्य नियोजन नसल्यामुळे नागरिकांची ससेहोलपट होत आहे, असा आरोप अनुसूचित जाती काॅंग्रेेस विभागाचे तालुकाध्यक्ष सुभाष तोरणे व अल्पसंख्याक विभागाचे सचिव दीपक कदम यांनी केला आहे.
सरकारने प्रथम ५० वर्षांवरील नागरिकांसाठी पहिला लसीचा डोस देण्याचा कार्यक्रम नियोजनबद्धरितीने राबवला. त्यात ग्रामीण रुग्णालयाने उत्कृष्ट काम केले.
ज्येष्ठांना पहिला डोसनंतरचा दुसरा डोस देण्याचे काम सुरु असताना १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरणाचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे ज्येष्ठांचा दुसरा डोस मिळणे बंद झाले. त्यामुळे दुसऱ्या डोेसची मुदत संपली आहे, अशा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
सरकारने प्रथम ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. अनेकांना रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार आहेत. त्यातच लसींसाठी उन्हात उभे राहावे लागत आहे. प्रशासनाने लसीकरण मोहिमेच्या नियोजनावर लवकरच धोरण निश्चित करावे व त्याबाबत वर्तमानपत्रातून माहिती द्यावी, अशी मागणी तोरणे व कदम यांनी केली आहे.
नगरपालिकेने बंद पडलेल्या शाळांमध्ये लसीकरण, कोरोना तपासणी केंद्र सुरू करावे, तसे केल्यास प्रशासनावरील ताण कमी होईल, अशी अपेक्षा प्रताप देवरे, कार्लस साठे, अविनाश काळे, प्रा. विजय बोर्डे, सरबजितसिंग चुग व नाना मांजरे यांनी व्यक्त केली.