श्रीरामपूर (जि. अहमदनगर) - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळा पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे. तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा या घोटाळ्याला कृपाशीर्वाद होता, असा आरोप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केला आहे.हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विकास कामांच्या भूमिपूजनाकरिता मंत्री कांबळे हे रविवारी श्रीरामपूरला आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महामंडळ ही एक नोंदणीकृत संस्था असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने त्याचे नूतनीकरण केले नाही. त्यातच आर्थिक घोटाळा केला. त्यामुळे महामंडळाची मान्यता रद्द झाली. चार पट दंड भरून पुन्हा मान्यता घ्यावी लागली. शिखर संस्था असलेल्या नॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडे महामंडळाची पत राहिलेली नव्हती. राज्यातील हिंगोली, बीड, उस्मानाबाद, सोलापूरसह ११ जिल्ह्यांमध्ये शेकडो जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा त्यात समावेश आहे. आजअखेर ८२ अधिकारी निलंबित झाले आहेत. राष्ट्रवादीच्या एका जिल्हाध्यक्षाला तब्बल २१ वाहने देण्यात आली. चार वर्षात महामंडळाच्या कर्जाची वसुली झाली नाही. ५० हजार रुपयांपर्यंतची कर्जे खिरापतीसारखी वाटण्यात आली. अनेक बोगस लाभार्थ्यांच्या नावे पैैसे काढण्यात आले. आता प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली जात आहे. या पैैशांचा हिशोब मागितला आहे.
साठे महामंडळातील घोटाळ्याला माजी उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 6:27 AM