नेवासा : मी आमदार असताना त्यावेळेस ९५० ट्रान्सफॉर्मर नेवासा तालुक्यात बसविले. त्यामुळे शेतीसाठीच्या विजेची मोठी समस्या दूर झाली. लोकहिताची कामे करण्यात समाधान मिळते, असे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात २५ के. व्ही. क्षमतेच्या रोहित्राचे उद्घाटन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानमधील विजेचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते गडाख यांचा सत्कार करण्यात आला. गडाख म्हणाले, मी आमदार असताना त्यावेळेस ९५० ट्रान्सफॉर्मर नेवासा तालुक्यात बसविले. ते ५० ते १०० के. व्ही. क्षमतेचे होते. २५० कोटींचे नियोजन यासाठी होते. विजेची मोठी समस्या दूर झाल्यामुळे शेतकरी हिताचे काम त्यावेळेस झाले. कामे करताना छोटी, मोठी कामे ही होतच असतात. मात्र मूलभूत प्रश्नांना हात घालून ते काम मार्गी लावणे हेच माझे ध्येय असते.
गुरुवर्य उद्धव महाराजांनीदेखील सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे मंदिर, विद्यालय, सांस्कृतिक भवन अशी अनेक कामे मार्गी लावली. या आध्यात्मिक कार्याला खारीच्या वाट्याच्या रूपाने माझादेखील मदतीचा हात राहील, अशी ग्वाही गडाख यांनी दिली.
यावेळी रामभाऊ जगताप, तुकाराम नवले, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, प्रकाश सोनटक्के, शिवाजी गपाट, मंगेश महाराज वाघ, सर्जेराव चव्हाण, संभाजी पवार, सतीश पिंपळे, बाळासाहेब कोकणे, दत्ता नवले, बाळासाहेब मारकळी, पी. आर. जाधव, ॲड. के. एच. वाखुरे, ॲड. बापूसाहेब गायके, प्रभाकर बोरकर, वीज मंडळाचे अभियंता शरद चेचर, सुनील धायजे, सचिन धोंगडे, नगरसेवक संदीप बेहळे, गणपत नळकांडे, बाळासाहेब जपे, संजय मारकळी उपस्थित होते.