श्रीरामपूर : मुळा-प्रवरा संस्थेच्या माध्यमातून पाच वर्षे कारभार करताना व्देषविरहित आणि सहकारी संस्था टिकावी म्हणूनच निर्णय केले. या माध्यमातून कामगारांना न्याय देता आल्याचे समाधान आहे. भविष्यात ही सहकारी संस्था सुरू व्हावी याच भावनेतून काम करण्याची ग्वाही अध्यक्ष खा.डॉ. सुजय विखे यांनी दिली. मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे, आ. राधाकृष्ण विखे, अंबादास ढौकचौळे, जलीलखान पठाण, रावसाहेब तनपुरे, संजय छल्लारे, सिद्धार्थ मुरकुटे, शिवाजी सागर, चित्रसेन रननवरे, अनिल भत्तड, दीपक शिरसाठ, रतनताई बेंद्रे, मच्छिंद्र अंत्रे यांच्यासह सभासद ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. विविध विषयांच्या ठरावांना या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
राजकीय षडयंत्रातून ही संस्था बंद झाल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली न्यायालयीन लढाई अद्यापही सुरू आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी झटणारा कामगार यामुळे देशोधडीला लागला होता. अशा कामगारांना आमच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात न्याय देता आला याचा अभिमान आहे. मागील पाच वर्षांची सत्ता जशी कामगारांसाठी उपयोगात आणली, तशी ही संस्था पुन्हा सुरू व्हावी याकरिता संघर्षातच गेली असल्याचे खा. विखे यांनी सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांनी विविध सूचना केल्या. जिल्हा सहकारी बँकेचे अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी संस्थेच्या न्यायालयीन लढाईचा आढावा घेतला. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सहकाराच्या ज्ञानमंदिरात पक्षीय मतभेद बाहेर ठेवून काम झाले पाहिजे, असे सांगितले. संस्थेचे कार्यकारी संचालक जे.जी. कर्पे, जगदीश लांडे, सुनील सोनवणे, राजेंद्र दंडापूर, सुनील गलांडे, सोपानराव गोरे, विजय शेलार उपस्थित होते.
..
२८मुळा-प्रवरा सभा
...
ओळ-
मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना खा. सुजय विखे. व्यासपीठावर मान्यवर.