श्रीरामपूर : तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी कोरोनाचे ४७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १३२ झाली आहे. शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटा मिळणे कठीण झाले आहे. शनिवारी खासगी प्रयोगशाळेमध्ये ४४ तर जलद चाचणीमध्ये ३ रुग्ण मिळून आले. गेल्या आठ दिवसांमध्ये दुसऱ्या लाटेत २५९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. २१ रुग्णांना रुग्णालयांमधून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
या परिस्थितीमुळे प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. विनाकारण कोणीही गर्दी करू नये तसेच व्यापारी वर्गाने दुकानांमध्ये व्यवहार करताना काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरामध्ये पालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांवर सक्त कारवाईच्या सूचना तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या आहेत.