येत्या आठ दिवसांत तोडगा काढून कामगारांना योग्य पगारवाढ देण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले असल्याची माहिती लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अध्यक्ष अॅड. सुभाष लांडे व युनिट अध्यक्ष सतीश पवार यांनी दिली.
अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च २०२० मध्ये संपली असताना नवीन करार करून महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. कोरोना महामारीचे व इतर कारण पुढे करून ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. या प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सात ते आठ तारखा झाल्या. यापैकी मोजक्या तारखांना विश्वस्तांनी हजेरी लावून कामगारांना दरमहा एक हजार चारशे पहिल्या वर्षीसाठी, दुसऱ्या वर्षी दोन हजार आठशे व तिसऱ्या वर्षी चार हजार दोनशे अशा टप्प्याटप्प्यांनी वाढ देण्यास सहमती दर्शवली. मात्र, कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने ही पगारवाढ परवडणारी नसल्याने कामगारांनी ट्रस्टचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
कामगारांचे अत्यल्प पगार असल्याने दरमहा चार हजार पाचशे तर पुढील दोन वर्षांसाठी दरमहा पाच हजार पाचशे रुपये पगारवाढ देण्याची मागणी युनियनच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनावर संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनील दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनीता जावळे, प्रवीण भिंगारदिवे यांच्या सह्या आहेत.