पाथर्डी/माणिकदौंडी : तालुक्यातील शिरसाटवाडी परिसरामध्ये दररोजच बिबट्याचे दर्शन होत आहे. एकाच वेळेला अनेक भागांत बिबट्या पाहिले गेले असून, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मनसे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी सोमवारी सकाळी शिरसाटवाडी येथे बैठा सत्याग्रह केला.
येथे नायब तहसीलदार पंकज नेवसे, तलाठी हरी सानप, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे, वनपाल आल्हाट यांनी अविनाश पालवे यांना आंदोलन थांबविण्याची विनंती केली. मात्र, पालवे यांनी जोपर्यंत तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून शिरसाटवाडी परिसरात पाच पिंजरे कधी लावाल ते सांगा, त्याशिवाय उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.
अविनाश पालवे म्हणाले, आतापर्यंत तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात तीन मृत्यू झाले आहेत. आमच्या गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू व्हायची वन विभाग वाट पाहत आहे काय? माझ्या एका जरी माणसाचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेला तर वनविभागाच्या एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर नायब तहसीलदार नेवसे यांनी निरभवणे यांना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ बोलण्यास सांगितले.
यावेळी नंदू शिरसाट, नारायण शिरसाट, मुरली पाटील शिरसाट, पोपट पालवे, तुषार शिरसाट, अंबादास शिरसाट, अंकुश शिरसाट, अशोक फुंदे, अनंता कराड, पप्पू सानप, बाबू शिरसाट, आजिनाथ सानप, बबलू शिरसाट, अशोक शिरसाट, विनोद शिरसाट, नामदेव खाडे, ज्ञानेश्वर कराड, नीलेश शिरसाट, शरद शिरसाट, रोहिदास शिरसाट, योगेश शिरसाट आदी उपस्थित होते.
चाैकट...
आठ दिवसांत पाच पिंजरे..
निरभवणे यांनी जिल्हा वनसंरक्षक आदर्श रेड्डी व सहायक वनसंरक्षक सुनील पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी येत्या आठ दिवसांत पाच पिंजरे लावू व वनरक्षक आपल्या भागात गस्त घालतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर बैठा सत्याग्रह तूर्तास स्थगित करीत असल्याचे जाहीर करण्यात आले.
फोटो : ०७ शिरसाटवाडी
शिरसाटवाडी येथे ग्रामस्थांनी वनविभागाला विविध मागण्यांचे निवेदन दिले. (छायाचित्र : संदीप शेवाळे)