नाशिक/अहमदनगर - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गटविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला. या निवडणुकीत नागपूरची जागा विजयी करण्यात काँग्रेसला यश आले. तर कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. अमरावती-औरंगाबाद इथं अटीतटीची लढत सुरू आहे. त्यात नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी होतील असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला होता. आता, स्वत: सत्यजित तांबे यांनी आपण विजयाच्या अगदी जवळ असल्याचे म्हटले. मात्र, मी हा विजय साजरा करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. मात्र, काँग्रेसचे खंदे समर्थक आतून सत्यजित तांबे यांच्यासोबतच होते. नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मानस पगार यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. विधानपरिषद निवडणुकांच्या निकालादिवशीच ही दु:खद बातमी कानी आली. सत्यजित तांबे यांचे ते चांगले मित्र होते. म्हणूनच, तांबे यांनी सकाळीच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. तर, सत्यजित यांचे वडिल सुधीर तांबे हे मानस पगार यांच्या अत्यविधीलाही गेले होते. येथील निवडणुकीत आता सत्यजित तांबेंचा विजय निश्चित मानला जात आहे. तिसऱ्या फेरी अखेर सत्यजीत तांबे यांना ४५, ६६० मतं मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी पाटील यांना २४,९२७ मतं मिळाली आहे. त्यामुळे, सत्यजित यांचा विजय निश्चित मानला जातो. त्यातूनच, त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.
विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही. माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती, अशी ट्विटर पोस्ट सत्यजित तांबे यांनी लिहिली आहे.
कोण होते मानस पगार
नाशिक जिल्हा ग्रामीणचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले. वयाच्या ३२ व्या वर्षी आपला कार्यकर्ता मित्र, वैचारीक बैठकांची धार असलेल्या पदाधिकारी आणि सोशल मीडियावर भूमिका मांडणारा मित्र गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जायचे. सोशल मीडियावर ते पक्षाची भूमिका मुद्देसूद आणि सशक्तपणे मांडायचे. त्यातूनच, सोशल मीडियावर त्याचा मोठा मित्रपरिवार तयार झाला होता. मात्र, आज सकाळीच त्यांच्या निधनाचे वृत्त धडकले अन् सर्वांना धक्का बसला.
सत्यजित तांबेच निवडून येतील - पवार
माझ्यासारख्यांनी काँग्रेसबद्दल बोलणं उचित नाही. एकेकाळी सत्यजित तांबे राज्यातील काँग्रेस युवकचे अध्यक्ष म्हणून बरीच वर्ष काम करत होते. पक्षाचा जवळचा कार्यकर्ता किंवा पक्षाशी बांधिलकी असणारा नवा चेहरा म्हणून पक्षाने जर उमेदवारी दिली असती तर असे काही घडले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सत्यजित तांबेंना अपक्ष उभे राहावे असं त्यांनी म्हटलं. तसेच निवडणुकीच्या काळात काही वेगळ्या प्रकारचा निर्णय त्याठिकाणी झाले. तांबे यांचे अख्खं घराणे, काँग्रेसच्या विचारधारेचे आहे. सुधीर तांबे हे आमदार होते. त्यामुळे सत्यजित तांबे सध्या आघाडीवर आहे. तेच निवडून येतील. त्यामुळे निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील असं सांगत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबेंना सल्ला दिला आहे.