मच्छिंद्र देशमुखकोतूळ : अकोले तालुक्यात गेल्या काही महिन्यांत जामगाव व अकोले येथे सावकारी जाचाला कंटाळून दोन जणांनी जीवनयात्रा संपवली. सध्या अकोले तालुक्यात आठवडे बाजारात छोटे व्यावसायिक या सावकारांची शिकार होत आहेत. किमान ५ ते २० रुपये टक्क्याने सावकार पैसे व्याजाने देत आहेत. या अवाजवी व्याजाने अनेक जण आत्महत्येचे बळी ठरत आहेत.अकोले, राजूर, कोतूळ या आठवडे बाजारात वाटलेल्या कर्जाचा आकडा कोटींच्या घरात आहे. तर तालुक्यात किमान दोनशेच्यावर खासगी सावकार आहेत. खेडोपाडी देखील हे लोन पसरले आहे. अकोले तालुक्यात दोन जणांचा जीव गेल्याने तालुक्यातील अवैध सावकारी चर्चेत आली. तालुक्यातील अकोले, राजूर, कोतूळ ही तीन गावे व्यापारी केंद्र आहेत. भाजीपाला, पाव बटर, चप्पल बूट, कटलरी, फळे, टपरीधारक, फेरीवाले, छोटे किराणा दुकानदार, शेळी, मेंढीचा व्यापार करणारे खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेत आहेत.आठवडे बाजारात दहा हजार रुपयांचे कर्ज घेतल्यास दर आठवड्याला दोनशे रुपये व्याज द्यायचे, सहाव्या आठवड्यात मूळ मुद्दल व आठशे रुपये असे दीड महिन्यात दहा हजाराचे दोन हजार व्याज होते. एक दिवस टळला तर दोनशे रुपये दंड होतो.सहाव्या आठवड्यात संपूर्ण रक्कम परत न केल्यास दोनशे रुपये जादा भरून नवे जुने केले जाते. किमान दहा हजार व कमाल एक लाखापर्यंत छोट्या व्यावसायिकांना कर्ज दिले जाते. असे संपूर्ण तालुक्यात आठवडे बाजारात किमान दोन तीन कोटींच्यावर रक्कम असल्याची चर्चा आहे.अकोले तालुक्यात नोंदणीकृत आठ खाजगी सावकार आहेत. अवैध सावकार व अवास्तव व्याज कुणी घेत असेल तर त्यांनी त्वरित आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कायदेशीर कारवाई करू. - कांतीलाल गायकवाड, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अकोले.