जामखेड : हैदराबाद येथील साई भक्त शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना जामखेड- नगर रस्त्यावरील पोखरी ( ता. आष्टी जि. बीड) येथील वळणाच्या रस्त्यावर इनोव्हा वाहन पलटी होऊन एका महिलेचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. उपचार चालू असताना निलावेणी श्रीरामडू नानचरला (वय २५) हिचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी असलेल्या रमना रेड्डी यास अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
हैदराबाद येथील साई भक्त शिर्डी येथे साई दर्शनासाठी इनोव्हा वाहनाने मंगळवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान नगर - जामखेड रस्त्याने जात असताना पोखरी (ता. आष्टी) येथील अवघड वळणावर इनोव्हा वाहन चालक हरीशंकर ( रा. हैदराबाद, आंध्रप्रदेश) यास वाहनाच्या वेगामुळे अंदाज न आल्याने वाहन पाच फूट खोल खड्ड्यात पडून दोन ते पलटी मारल्याने वाहनातील प्रवाशांना जोरदार मार लागून वाहनातील सर्वजण गंभीर जखमी झाले. पोखरी येथील एका व्यक्तीने सदर अपघात घटनेची माहिती जामखेड येथील माजी सरंपच सुनिल कोठारी यांना दिली. त्यांनी तात्काळ अॅम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी गेले. अरूणा रमना रेड्डी (वय २८),हनुमंत सत्या आण्णा आरो (वय २५), निलावेणी श्रीरामडू नानचरला (वय २५), रमना रंगादास रेड्डी (वय ३६), साईचरण (वय ५१), प्रणिती रेड्डी (वय १२), श्रीजा (वय-१२), हरीशंकर (वय २५) या सर्वांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी युवराज खराडे, डॉ. गिते, डॉ. लाड यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जामखेड येथील तीन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रस्त्याचे काम प्रलंबित जामखेड - नगर रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश होऊन वर्ष झाले आहे. परंतु अद्याप या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम खाते या रस्त्याला निधी नसल्याचे सांगितले जात.े त्यामुळे ते रस्त्याची देखभाल करित नाही. रस्त्यावर खड्डे पडले तर तात्पुरते मुरूम टाकून खड्डे बुजवले जाते. त्यामुळे जामखेड - नगर रस्ता अपघाती रस्ता ठरला आहे.