शिर्डी : ऐन साई समाधी शताब्दी वर्षातच सार्इंच्या तथाकथित जन्मस्थानाचा वादाने डोके वर काढले आहे. जन्मस्थानाचा मुद्दा उकरून काढणे व त्याला खतपाणी घालणे म्हणजे सार्इंच्या सर्वधर्म समभावाला तिलांजली देण्यासारखे आहे. सध्या वरीष्ठ पातळीवरून सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे शिर्डीकरांची सबुरी संपुष्टात आली आहे. जन्मस्थळाच्या वादाला खतपाणी घालणा-या प्रवृत्तीच्या विरोधात येत्या गुरूवारी शिर्डीतुन ग्रामस्थ एल्गार पुकारणार आहेत.शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांनी आज, मंगळवारी सकाळी एकत्र येत या विषयावर गंभीरपणे चर्चा केली. येत्या गुरूवारी सायंकाळी ४ वाजता मारुती मंदीराजवळ ग्रामसभेच्या माध्यमातुन सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेवुन व परिस्थीतीची कल्पना देवुन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. तत्पुर्वी याच दिवशी याच विषयावर नगरपंचायतच्या तातडीच्या विशेष सभेचेही आयोजन होण्याची शक्यता आहे.साईबाबांचे समाधी वर्षातच बाबांच्या तथाकथित जन्मस्थळ समोर आणुन साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या शिकवणुकीवरच घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. साईबाबांनी आपल्या संपुर्ण जिवन चरीत्रामध्ये जातीपातीला थारा न देतां सबका मालिक एक हा मुलमंत्र जगाला दिला. यामुळेच शिर्डी हे देशविदेशातील सर्व जातीधर्मीयांचे एकमेव तिर्थक्षेत्र बनले असुन एकात्मतेचे प्रतिक आहे. सार्इंच्या जन्मस्थानाच्या मुद्दयावरून या शिकवणुकीवरच घाला येवु पहात आहे. यामुळे शिर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व तमाम साईभक्तांच्या भावना दुखविल्या असुन तिव्र संतापाची लाट पसरली आहे.साईबाबांच्या जन्मस्थळाला मान्यताच नसुन याविषयी काही अपप्रवृत्ती जाणिवपुर्वक वाद निर्माण करुन बाबांच्या शिकवणुकीला हरताळ फासत आहेत. साईंच्या मान्यतेने लिहिलेल्या साईचरीत्रामध्येच जन्मस्थळा विषयी उल्लेख नाही तेव्हा याविषयी चुकीचा प्रचार होवु नये अशी ग्रामस्थांची व साईभक्तांची प्रामाणिक भावना आहे. या भावनेतुनच शिर्डीकर आंदोलनासाठी सरसावले आहेत.
साई जन्मस्थळाच्या वादावरून साईनगरीत असंतोषाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 5:28 PM