रोहीत टेकेकोपरगाव : स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वप्नांचा बाजार, न संपणारी शर्यत, प्रचंड अभ्यास, मेहनत, जिद्द, चिकाटीने अडचणींची पाऊलवाट तुडवायची असते. त्यातून आपल्या भविष्याची हवी ती स्वप्ने निवडायची असतात. असेच काहीसे कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावच्या नंदकिशोर लक्ष्मण वाबळे व निलेश भास्करराव गंगावणे या दोन मित्रांनी आपल्या परिवारासह स्थानिक शाळेचे, गावाचे आणि तालुक्याचे जिल्ह्यात नावलौकिक देऊन युवा पिढीसमोर एक आदर्श उभा केला आहे.कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील अॅड.भास्करराव गंगावणे व आई मंदाकिनी या दाम्पत्याच्या घरी १२ फेब्रुवारी १९८८ साली निलेश यांचा जन्म झाला. अगदी बालपणापासून निलेशला खाकीचे नेहमीच आकर्षण होते. निलेश यांचे घरी आजही एकत्रित कुटुंब पद्धती बघावयास मिळते. सर्वसाधारण सुशिक्षित कुटुंब म्हणून गावात एक वेगळी ओळख आहे. वडील भास्करराव गंगावणे हे कोपरगाव येथे विधिज्ञ आहेत. आई मंदाकिनी गृहिणी आहे. दोन मोठे भाऊ पैकी एक भाऊ नितीन हे देखील विधिज्ञ आहेत तर दुसरे भाऊ शशिकांत हे एका बँकेत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. तर दोन चुलते नोकरी तर दोन चुलते शेती तर एक ठेकेदारी व्यवसाय करतात.निलेशचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर जगदंबा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात २००४ साली दहावी उतीर्ण झाला. अकरावी-बारावीचे शिक्षण कोपरगाव येथील सदगुरू गंगागीर महाविद्यालयात घेतले. पुढील अॅग्रीकल्चर विभागातील पदवीचे शिक्षण हे नाशिक येथील नामांकित महाविद्यालयात घेतले. तर मुंबई विद्यापीठातून अॅग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंटची उच्च पदवी २०१३ साली घेतली. खऱ्या अर्थाने वास्तविक जीवन प्रवासाला सुरवात झाली.२०१४ साली मकर संक्रांतीपासून निलेशने लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. मे महिन्याच्या सुरुवातीलाच स्पर्धा परीक्षा दिली. त्यात फक्त ४ गुणावरून वनविभागाच्या ‘रेंज फॉरेस्ट आॅफिसर’ या पदाची संधी हुकली. त्यातून त्याला खूप नैराश्य आले. २०१६ साली केंद्रीय स्तरावरील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली परंतु शारीरिक चाचणी मध्ये अनफिट झाला. २०१७ साली तर केंद्रीय आणि राज्यस्तरीय पोलीस प्रशासनाच्या पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. परंतु पुन्हा एकदा केंद्रीय निवडीत अनफिट झाला. मात्र यावेळी निलेशने निराश न होता फिट होण्यासाठी नाशिक येथे अकादमीत जाऊ लागला व स्वत:चे तब्बल १६ किलो वजन कमी केले. २०१७ सालीच निलेशने कृषी पदवीधर मधून कृषीसहायक या पदाची देखील परीक्षा दिली होती. त्यात उत्तीर्ण होत निलेश आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात कृषी सहायक म्हणून कार्यरत आहे. निलेश लवकरच पोलीस उपनिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेईल.‘‘ माझ्या आई-वडिलांनी व संपूर्ण कुटुंबानी घेतलेले कष्ट यांची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. अनेकांनी खंबीर पाठिंबा दिल्याने यश मिळवू शकलो.’’ - निलेश गंगावणे