ढवळगाव : गटशिक्षणाधिका-यांनी सक्तीच्या रजेवर पाठविलेले शिक्षक पुन्हा शाळेत हजर झाल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील जि प प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी पुन्हा टाळे ठोकले.कार्यपद्धतीवर आक्षेप घेत शाळेतील शिक्षक दौलत उगले यांना गटशिक्षणाधिकारी एन.बी.बोरुडे यांनी मध्यंतरी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. परंतु ते पुन्हा शाळेत हजर झाले. त्यामुळे पालक व ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी शाळेला टाळे ठोकून रोष व्यक्त केला. दरम्यान, माजी मंत्री बबनराव पाचपुते व शिक्षक संघटनांनी मध्यस्थी करुन ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्यास प्रवृत्त केले. शिक्षक उगले यांनी आपल्या सर्व चुका मान्य करून तशी माफी मागून माफीनामा ग्रामस्थांना लिहून दिल्यानंतर ग्रामस्थांनी अधिकारी व पाचपुते यांच्या उपस्थितीत वर्ग उघडून दिले. दरम्यान, त्यानंतर पाचपुते व गट शिक्षणाधिका-यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी रमेश ठुबे, रवींद्र शहाणे, प्रवीण ठुबे,सचिन कातोरे, मुख्याध्यापक सातपुते,माणिक ढवळे, उपसरपंच अजय वाळुंज, मच्छिंद्र डोंगरे, बाबासाहेब शिंदे, गौतम वाळुंज, तसेच पालक व मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकाची दिलगिरी
माझ्या बोलण्यामुळे किंवा वर्तणुकीमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो. तसेच यापुढे अशी चूक होणार नाही अशी ग्वाही देतो, असे शिक्षक दौलत उगले यांनी माफीनाम्यात म्हटले आहे.