भाऊसाहेब येवलेराहुरी : पायजमा, नेहरू शर्ट, डोक्यात टोपी अन् गळ्यात उपरणे अशा पोषाखातील शेतकरी गेल्या १६ वर्षापासून ऊस शेतीवर संशोधन करीत आहे. साधे राहणीमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने ८६०३२ या वाणावर संशोधन करून इशुदंडू ज्ञानेश्वर-१६ हा उसाचा वाण तयार केला आहे. निसर्गातील होणाऱ्या बदलाचा आधार घेत ज्ञानेश्वर निसर्ग केंद्रीत पीक संशोधन केंद्रात तयार केलेल्या वाणाने राज्यभर नावलौकिक मिळविला आहे. मूळ वाणातील दोष घालवून शेतकºयांना दर्जेदार वाण भानसहिवरे येथील शेतकरी विश्वनाथ चव्हाण यांनी दिले आहे.चार्लस् डार्वीन यांच्या उत्क्रांतीवाद सिध्दांताचा विश्वनाथ चव्हाण यांनी अभ्यास केला. १६ वर्षाच्या अथक प्रयत्नातून १६ उतीत परिवर्तन करण्यात आले. देशातील संशोधन कें द्रात संशोधन झाल्यानंतर विविध जाती शेतक-यांच्या शेतावर येतात़ दोन वर्षानंतर शेतक-यांना त्याचे फायदे तोटे समजतात. शेतक-यांच्या फायद्याच्या दृष्टीने विश्वनाथ चव्हाण यांनी ८६०३२ या वाणातील असलेले दोष घालविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यातून तयार झालेला परिपूर्ण ज्ञानेश्वर-१६ हा वाण वरदान ठरत असल्याचे आढळून येत आहे.केवडा रोग येत असे. तो घालविण्यात विश्वनाथ चव्हाण यांना यश आले आहे. गवताळ वाढ सुरूवातीला होत असे. तो दोषही संशोधनातून दूर करण्यात आला. पडणारी काळी कानी दोष दूर करण्यात यश आले. तुरा येत होता तो दोष घालविला. संशोधनातून विश्वनाथ चव्हाण यांना आढळले की, २५ महिन्यात देखील उसाला तुरे आले नाहीत. कांड्याला कॅ्रक पडत असे़ कॅ्रक पडण्याचाही दोष घालविण्यात आला़ उसाच्या पानाची जाडी व रूंदी वाढविण्यात यश आले़ दर्जेदार उसातून दर्जेदार रसाची निर्मिती करणे शक्य झाले. साडेबारा टक्क्यावरून उतारा १४ टक्क्यांवर नेण्यात चव्हाण यांना यश आले आहे.एका डोळ्यापासून तयार झालेल्या उसाला ३० ते ४० फुटवे निर्माण करणे विश्वनाथ चव्हाण यांना अथक प्रयत्नातून शक्य झाले आहे. रासायनिक खताचा वापर न करता उसाचे उत्पादन ६० टनावरून १६३ टनापर्यंत नेण्यात चव्हाण यांना यश आले आहे. चव्हाण यांना पंजाबराव कृषिरत्न पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहे. शंभरपेक्षा अधिक गौरवपत्रही मिळाले आहे. कृषी विद्यापीठ, ऊस संशोधन केंद्र व साखर कारखान्यांनीही चव्हाण यांच्या संशोधनाची दखल घेतली आहे़ केवळ ऊस संशोधनावरच विश्वनाथ चव्हाण थांबलेले नाहीत. त्यांनी रामफळ, पपई, गिन्नी ग्रास, लसून घास आदी १३ पिकांवर संशोधन केले आहे़ राज्यभरातील शेतक-यांना हवे असलेले वाण उपलब्ध करून दिले आहेत. वयाच्या पासष्टीतही विश्वनाथ चव्हाण यांचे शेतक-यांसाठी सुरू असलेले संशोधन प्रेरणादायी आहे.
भानसहिवरे येथील शेतकरी उसाच्या शेतीतून बनला शास्त्रज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 2:35 PM