रोहित टेकेकोपरगाव :स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वप्नांचा बाजार, न संपणारी शर्यत, प्रचंड अभ्यास, मेहनत, जिद्द, चिकाटीने अडचणींची पाऊलवाट तुडवायची असते. त्यातून आपल्या भविष्याची हवी ती स्वप्ने निवडायची असतात. असेच काहीसे कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावच्या नंदकिशोर लक्ष्मण वाबळे व निलेश भास्करराव गंगावणे या दोन मित्रांनी आपल्या परिवारासह स्थानिक शाळेचे, गावाचे आणि तालुक्याचे जिल्ह्यात नावलौकिक देऊन युवा पिढीसमोर एक आदर्श उभा केला आहे.कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील शिक्षक लक्ष्मण वाबळे व आशाताई या दाम्पत्याच्या घरी १५ डिसेंबर १९९० साली नंदकिशोर यांचा जन्म झाला. नंदकिशोरचे सर्वसाधारण सुशिक्षित कुटुंब आहे. वडील लक्ष्मण वाबळे हे सेवानिवृत्त शिक्षक. आई लताताई गृहिणी तर आहेच परंतु एक प्रगतशील महिला शेतकरी देखील आहेत. लहान भाऊ पंकज व बहीण ऋतुजा हे दोघे शिक्षण घेत आहेत. नंदकिशोरचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर जगदंबा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात २००६ साली दहावीला ८१ टक्के गुण घेत उतीर्ण झाला. पुढील अकरावी-बारावीचे शिक्षण नाशिक येथील एका महाविद्यालयात घेतले. २००८ बारावीला ७९ टक्के गुण मिळवून लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी विद्यालयातून २०१२ साली अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि खऱ्या अर्थाने वास्तविक जीवन प्रवासाला सुरवात झाली.नंदकिशोरने पदवी प्राप्त केल्यानंतर २०१२ ते २०१४ ही दोन वर्षे नाशिक येथील एका खासगी नामांकित कंपनीत नोकरी केली. परंतु तेथेही त्याची घुसमट होऊ लागली. कारणही तसेच होते. त्यावेळी त्याचा महाविद्यालयीन काळातील एक मित्र भेटला तेव्हा तो स्पर्धा परीक्षेतून केंद्रीय स्तरावरचा अधिकारी बनला होता. हे बघून नंदकिशोर हा खूप प्रभावित झाला. नोकरीसाठी बसने जाण्यासाठी निघाला आणि रस्त्यावर उभा असताना त्याला एका भरधाव डंपरने कट मारला. त्या डंपरच्या मागे लिहिले होते ‘तू पुढे जा देव तुझ्या पाठीशी आहे.’ या नोकरीविषयी होत असलेली घुसमट त्यातून या एका वाक्याच्या मिळालेल्या प्रेरणेने नंदकिशोरने त्याच दिवशी २२ हजार रुपये महिन्याच्या नोकरीचा राजीनामा देऊन २०१४ साली आपल्या घरी येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे ठरविले. त्यानुसार नंदकिशोरने २०१४ साली लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा पहिला प्रयत्न केला. त्यात अपयश आले. २०१५ साल हे जाहिरातच न निघाल्याने वाया गेले. पुन्हा २०१६ साली देखील निसटते यश पदरात पडले परंतु सातत्य ठेऊन २०१७ ची संधी काही केल्या हातून जाऊ द्यायची नाही हा मनाशी पक्का निर्धार केला आणि मग काय दिवस-रात्र मेहनत करून २०१७ ला मुख्य परीक्षेत २०० पैकी १२६ गुण आणि शारीरिक १०० पैकी ९१ गुण मिळवून पठ्ठ्या नंदकिशोर हा पोलीस उपनिरीक्षक झालाच.‘‘खरे तर मला बालवयापासूनच अभिनयाची फारच आवड होती. परंतु महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यावेळी आपल्या नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या कामाची पद्धत पाहून मी खूप प्रभावित झालो. त्यांनाच आपला आयडॉल मानू लागलो. या सर्वात महत्वाचे म्हणजे आजवरच्या प्रवासात माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य खंबीरपणे पाठीमागे उभे राहिले.’’ - नंदकिशोर वाबळे