अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यात सुरू असलेल्या सर्वपक्षीय आघाडीच्या बांधणीवर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शिक्कामोर्तब झाले. नगर तालुक्यात या निमित्ताने शिवसेना-भाजपा-काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आल्याने विधानसभेसाठी तालुक्यात सर्वपक्षीयांची एकत्रित मोट भक्कम झाली असल्याचे दिसून आले.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या नगर पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाच्या निवडीमुळे नगर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले. पंचायत समितीत १२ पैकी ७ सदस्य युतीचे असूनही व बहुमताचा आकडा असूनही युतीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत फूट पाडून काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादीचा एक असे काँग्रेस आघाडीचे ५ पैकी ४ सदस्य आपल्या गोटात आणून तालुका एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून संदेश कार्ले सभापतीपदी व शरद झोडगे उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले.आ.शिवाजी कर्डिले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्याबरोबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव लामखडे यांची एकत्रित चर्चा झाली. या सर्वांनी तासभर चर्चा करून नगर तालुका एकसंध ठेवण्याचा निर्णय घेतल्यानेच काँग्रेसचे तीन सदस्य व राष्ट्रवादीचा एक सदस्य युतीच्या गोटात सामील झाले.विधानसभा निवडणुकीसाठी नगर तालुक्याला स्वतंत्र मतदारसंघ नसल्याने सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन तालुका आघाडी स्थापन्याच्या हालचाली काही दिवसांपासून सुरू होत्या. पंचायत समिती पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने तालुक्यातील सर्वपक्षीय नेते तालुका अस्मितेच्या नावाखाली एकत्र आल्याचे दिसून आले. सर्वपक्षीयांच्या बळावर नगर तालुक्याचे राहुरी, श्रीगोंदा व पारनेर मतदारसंघात स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होती. ती या निवडीच्या निमित्ताने आज तरी यशस्वी ठरली. आता याच एकत्रित ताकदीच्या जोरावर विधानसभेला सामोरे जाण्याचा निर्णयही घेण्यात आला.राष्ट्रवादीचा गट वेगळाच नगर तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव लामखडे, तसेच पंचायत समिती सदस्य राजू शेवाळे हे तालुक्याच्या एकीला ओ देत सर्वपक्षीय आघाडीत सामील झाले. मात्र तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष केशव बेरड, युवकचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव, पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी मात्र या एकत्रित आघाडीपासून तटस्थ राहत आपला राजकीय विरोध कायम असल्याचे दाखवून दिले.सच्च्या सैनिकाला न्यायसंदेश कार्ले नगर तालुक्यात सच्चे शिवसैनिक म्हणून ओळखले जात असले तरी इतर पक्षीयांच्या नेत्यांशी व कार्यकर्त्यांशीही त्यांचे स्नेहाचे संबंध असल्याने त्यांना सभापती करण्यासाठी काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादीचा एक सदस्य सरसावला. सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाल्याने नगर तालुक्यातील शिवसैनिकांनी एकच जल्लोष केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
सर्वपक्षीयांच्या एकत्रित आघाडीवर शिक्कामोर्तब
By admin | Published: September 14, 2014 11:05 PM